वऱ्हाडी साहित्य मंचाचे अध्यक्ष श्याम ठक यांची जिल्हा मराठी भाषा समितीवर नियुक्ती


 संजय देशमुख  28 Jan 2022, 4:27 PM
   

अकोला : वऱ्हाडी बोलीभाषा संवर्धन संस्था बार्शीटाकळी जि.अकोला द्वारा संचालित अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच अकोला चे संस्थापक अध्यक्ष तथा वऱ्हाडी साहित्यिक श्याम ठक यांची महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार अकोला जिल्हयामध्ये मराठी भाषा समितीवर अशासकीय सदस्य म्हणून जिल्हाधिकारी मा. निमा अरोरा यांनी नियुक्ती केली आहे. श्याम ठक यांच्यासह सुरेश पाचकवडे, डॉ. विनय दांदळे, मयूर लहाने यांची नियुक्ती झाली आहे. 

अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाच्या बोलीभाषा चळवळीची अधिकृत दखल श्याम ठक यांच्या जिल्हा मराठी भाषा समितीवर नियुक्तीमुळे घेतल्या गेली आहे. श्याम ठक यांनी अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच अकोलाच्या माध्यमातून आजवर तीन अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. तर चौथे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन संतनगरी शेगाव इथे प्रस्तावित आहे. त्यांनी वऱ्हाडी बोलीभाषा संवर्धन करण्यासाठी चिरांगन या अस्सल वऱ्हाडी दिवाळी अंकाचे प्रकाशन चार वर्षांपासून सातत्याने केले आहे. बोलीभाषेत प्रकाशित होणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच दिवाळी अंक आहे. शिवलिंग काटेकर यांच्या वऱ्हाड धन या वऱ्हाडी शब्दकोशाचे त्यांनी ॲप मध्ये रुपांतर केले आहे. वऱ्हाडी बातम्यांसाठी त्यांचे कानोसा वऱ्हाडी न्यूज पोर्टल आहे. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाचे स्वतःचे प्रकाशन असून त्यांनी काही वऱ्हाडी पुस्तके प्रकाशित केली आहेत. अशा काही उपक्रमांच्या माध्यमातून वऱ्हाडी साहित्य मंचाच्या निमित्ताने वऱ्हाडी साहित्यिकांना हक्काचे विचारपीठ निर्माण झाले आहे.
 श्याम ठक यांच्या निमित्ताने जिल्हा मराठी भाषा समितीवर वऱ्हाडी बोलीला स्थान दिल्याबद्दल जिल्हाधिकारी मा. निमा अरोरा यांचे जिल्ह्यातील साहित्यिकांनी आभार मानले आहे.  त्यांच्या नियुक्तीचे भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच कोअर कमिटी सदस्य तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई चे सदस्य पुष्पराज गावंडे, प्रा. सदाशिव शेळके, निलेश कवडे, रविंद्र दळवी आणि निलेश देवकर यांनी स्वागत केले आहे.

    Post Views:  398


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व