निलंगा (जि. लातूर) : १५ ते २० वर्षांपासून स्मशानभूमीला शासनाकडून जागा मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी मृत महिलेवर ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार केले. हणमंतवाडी अं. बु. (ता. निलंगा) येथे गुरुवारी हा प्रकार घडला. हणमंतवाडी येथील ग्रामस्थ २० वर्षांपासून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करत आहेत; मात्र अद्याप स्मशानभूमीचा प्रश्न संपुष्टात आला नाही. येथील जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने गावातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायचे कुठे, असा प्रश्न आहे. दरम्यान, सोजरबाई रामचंद्र निकम (७०) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर थेट ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आणि ठरल्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयासमोर चिता रचून पेटविली आणि अंत्यसंस्कार केले.
अंबुलगा तलावानजीक जागा उपलब्ध...
nसार्वजनिक स्मशानभूमीसाठी १९८५ मध्ये २० गुंठे जमीन अधिग्रहित करण्यात आली होती; परंतु त्या जमिनीची विक्री करण्यात आली आहे. दरम्यान, खरेदीदाराने न्यायालयातून मनाई हुकूम आणला आहे. ग्रामसेवक, तलाठ्यांनी गावाजवळील अंबुलगा तलावाजवळ अंत्यविधी करण्यास जागा उपलब्ध करून दिली आहे; मात्र काही नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी करून अतिरेक केला आहे, असे तहसीलदार गणेश जाधव म्हणाले.
स्मशानभूमीच्या जागेचा वाद न्यायालयात...
सार्वजनिक स्मशानभूमीसाठी चार गुंठे जागा गावाने खरेदी केली होती; परंतु संबंधित शेतमालकाने ती जागा गावातील एकास विक्री केली. विक्री करणारा आणि खरेदी करणारा हे दोघेही जागा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीने न्यायालयात धाव घेतली आहे. स्मशानभूमी तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा केला; मात्र शासन अंत्यविधीसाठी जागा देत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन जागा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी केली आहे.
- प्रभाकर मलिले, सरपंच
Post Views: 182
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay