प्रत्यय : वेदनेची अभंग लय - प्रभाकर तांडेकर
प्रदत्त काळ्या मातीत रूतून जगाला पोसणारा शेतकरी, कारखान्याच्या धुराडयात होरपळून वस्तूंचे उत्पादन करणारा कामगार, आपल्या आयुष्याची घडी विस्कटून विविध वास्तुला आकार देणारा कारागीर हाताच्या करामती कौशल्यातून सुंदर व स्वच्छतेचा ध्यास बाळगणारा परंतु व्यवस्थेचा बळी ठरलेला मजूर, शोषित, पीडित हे सर्व सृजनकारी घटक समाजाचे अंग असूनही नाही रे वर्गात मोडण्याचे शल्य समाजसुधारकांना बोचले; त्यातून शोषणरहित समाज निर्मितीचा साम्यवादी विचार त्यांच्या लेखनीतून झिरपला. समाज परिवर्तनाच्या या नंदादीपाला तेवत ठेवण्याचे कार्य साहित्यिकांनीच अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. कष्टकऱ्यांचे जगणे अंधारात हरवले जाऊ नये यासाठी त्यांच्या समस्या व प्रश्नांना जोरकसपणे वाचा फोडली. शोषणाची सर्व परिमाणे भोगलेल्या एखाद्या शेतकरी कुटुंबातील कवी शेतकऱ्यांची दयनीय स्थिती, नापिकी, कर्जाचा डोंगर, मजुरांची बेरोजगारी, आर्थिक शोषण, व्यवस्थेकडून होणारी अडवणूक काव्यातून मांडत असेल तर त्यातील हृदयद्रावक विदारकता अंगावर काटे आणल्याशिवाय राहत नाही.
क़वीचे जीवन व त्यातून स्फुरलेली कवने यांचा अन्योन्य संबंध असतोच. म्हणून समग्र समाजजीवनाचे प्रतिबिंब त्याच्या साहित्यातून उमटतात. निर्मल मनाच्या व साध्या माणसाच्या हृदयातून तर ते अभंग काव्यरूपातच स्त्रवतात आणि शब्दांशब्दांतून प्रत्ययाचा साक्षेपी गंध येतो. प्रत्यय म्हणजे जीवन जगताना आलेली प्रचिती वा अनुभव होय. अशीच अनुभूतीची प्रत्ययकारी कळा प्रा. सतीश देशमुख वेणीकोठेकर यांच्या प्रत्यय या काव्यसंग्रहातील ८६ कवितांपैकी ग्रामीण भागातील मानवी जीवनाची सहज लय असलेल्या २२ अभंगातून अनुभवावयास मिळते. म्हणून त्यांची कविता कष्टकऱ्यांच्या आत्मानुभवाचा प्रत्यय सांगणारी वेदनेची अभंग लय असून समाज वास्तवाची धग वाचकांपुढे मांडते व अस्वस्थ करीत चिंतनाच्या पातळीवर घेऊन जाते.
शेतकरी, मजूरवर्ग रखरखत्या उन्हात तापून आपल्या घामांच्या धारांनी काळ्या मायला सिंचीत करतो. रात्रंदिन तिची सेवा करून अन्नदाता म्हणून जनतेला घास भरवतो. कापूस पिकवून लज्जा झाकणाऱ्या कापडाची सोय करतो. त्यानेच उपाशापोटी व उघडया पाठी राहून मरणाआधीचा, मरण सोहळा अनुभवावा; ही कष्टकरी जीवनातील विसंगती कवी प्रा.सतीश देशमुख वेणीकोठेकर यांनी अस्मानी संकट नाही नवे देशा सुलतानी देशा ओळखावे या अभंगातून परखडपणे मांडली आहे.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचा राडा केला, तर मिंध्या सत्ताधाऱ्यांनी धान्यपिकाच्या हमीभावाला दलालांच्या घशात घालून संसाराचा चुराडा केला. एकीकडे प्रकोपी निसर्ग तर दुसरीकडे राजसत्तेचा उपसर्ग यात लोकराज्य संकल्पनेची आहुती दिली गेली; आणि अच्छे दिन येतील, अशी आश्वासने देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलीत. सुगीचे दिवस तर आलेच नाही, उलट तप्त सूर्याचा अष्टगंध लेवून, फुफाटयात जळून त्यांच्या अख्ख्या प्रपंचाचा वणवा झाला.
म्हणून कवी -
शब्दांचे वारूळ उभारले कुणी आयुष्याची धुनी जळताना असे उपरोधिकपणे विचारणा करून सरकारला धारेवर धरतो.
विपन्नावस्थेतून बाहेर पडण्यासाठी आपले गाहाणे कुणासमोर मांडावे या द्विधा मनःस्थितीत श्रमणारा सापडला आहे. जनप्रतिनिधी म्हणवणाऱ्या व समाजसेवेचा आव आणणाऱ्या पुढाऱ्यांकडे माफक अपेक्षा करावी, तर तोही लांबणीवरची भाषा बालतो. त्यांचीही सजगता लोप पावली आहे. पडत्या वेळी समाजातील माणसे आधारवड होऊन आमच्या जीवनात केशर पहाट उगवून साथ देतील असे वाटत होते; ती आस सुद्धा अंधारलेल्या वाटेत विरघळायला लागली. आतापर्यंत माणूसपण जपणारी माणसे आपलाच डाव साधण्याच्या प्रयत्नात दिसतात. त्यांच्या ललाटीच्या रेषा अंधुकल्या आहेत. काळया मातीत आपले साम्राज्य निर्माण करणाऱ्या ढाण्या वाघाची आरोळी निमावली आहे. म्हणे माणसात शोधून पहावा त्यासही वणवा लागलेला या आशयगर्भ ओळीतून कवी समाजातील तुटलेपणाची हीन भावना मांडतो आणि जन्मास लाभलेल्या दुःखभोगाची वेदना अनाठायी असल्याचे स्पष्ट करतो.
लोकांनी स्वतःचे आणि समाजाचे हित जपण्यासाठी स्वतः निर्माण केलेली आणि स्वतः निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत चालविलेली शासनव्यवस्था म्हणजे लोकशाही होय. थोडक्यात अब्राहम लिंकन यांच्या शब्दात लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले सरकार म्हाजे लोकशाही! परंतु सत्तालोलुप सरकारला लोकहिताचाच विसर पडला आहे. यामुळे कवी अस्वस्थ दिसतो,
सांगावी कुणाला उठलेली कळ कानोकानी मळ साचलेला या रचनेतून लोकशाहीची महिमा शाबूत ठेवण्याची शपथ घेतलेल्या लोकप्रतिनिधींची कष्टकऱ्यांप्रती असलेली उदासीनता प्रकट होते. यातील घुसमट व शोकात्मता वाचकाला अंतर्मुख करते.
मातीची आण घेऊन त्यात प्राण फुकणारा पोशिंदा आपल्या अथक प्रयत्नाने वृंदावन फुलवायची पराकाष्ठा करतो, त्यासाठी पै-पैची तडजोड करून वेळप्रसंगी आपले घर, दागिणे गहाण ठेवतो. स्वतः भंगून मातीवरची निष्ठा भंगू देत नाही. मातीला संजीवनी देतो. मातीतूनच लायचे व मातीतच मिसळायचे ही कृतज्ञतेची भावना व्यक्त करताना कवी म्हणतो,
नेकीने ओढावा हा पांगूळगाडा मालकाचा वाडा
गहाणात तरीही बळीराजा इमाने इतबारे मातीशी उजेडाची नाती सांधण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. यात कवीच्या अनुभवाचे काव्यरूप दिसून येते.
जेमतेम दोन वेळच्या भोजनासाठी आसुसलेला, काबाडकष्ट उपसणारा कामगार वर्ग खूप भोळा-भाबडा आहे. जेव्हा त्याचा आपल्या माणसावरचा विश्वास उडतो तेव्हा आपला तारणारा एकमेव देव आहे, हाच भक्तीभाव मनी धारण करतो; म्हणून झळा असो की पावसाळा त्याच्या पूजेसाठी आतूरलेला असतो. तेथेही त्यास द्वैत-अद्वैताच्या फुटक्या पाषाणाची प्रचिती येते. कारण देव भटशाहीच्या गराडयात बंदिस्त होऊन अगतिक झालेला दिसतो. भक्तांना प्रसादरूपात कोणतीच दुवा देण्याइतपत सक्षम राहिला नसल्याने त्याचेच भविष्य दावणीला लागले आहे, अशी स्पष्टोक्ती कवी अधोरेखित करतो.
कसा पांडुरंगा भुलला गर्दीत सेवक वर्दीत असताना असा निर्भीडपणे व्यक्त होऊन पुजारी, भटांनीच मंदिराचा गाभारा काबीज केल्याचे जाहीरपणे वदतो.
संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या गाथेतून समाजातील वंचितांचे दुःख वेशीवर टांगले. त्यांना जगण्याची ऊर्जा दिली. अंधश्रद्धेवर प्रहार केले. तळागाळातील जनतेला कर्मकांडातून मुक्त केले. सावकारी पाशाला तोडले. द्रोही व्यवस्थेविरुद्ध विद्रोह केला. त्याच अंभंगाचा आधार घेऊन तुकोबारायाचे जनहित कार्य निरंतर सुरू ठेवण्याचा ध्यास कवीने घेतला आहे. समाजातील विषमतेची दरी पाहून सैरभैर होतो. म्हणून कामगार वर्गाचा आत्मविश्वास व उमेद जागविण्यासाठी ग्रामीण भाषेतील अभंगातून कवीने लेखनीची ताकद पणाला लावली आहे. माझिया अभंगी उजेडाची व्यथा तुकयाची गाथा बोलवीन अशाप्रकारे समाजाच्या उन्नयनासाठी आपली भूमिका अगदी स्पष्ट केली आहे. कवी अभंगातून कधी व्यथा मांडतो; तर कुठे वेदनेला कुंकर घालून आश्वस्त करतो.
कवीने सहजतेने अभंग काव्यप्रकार हाताळला आहे. काही अल्पशा अभंगात अक्षरसंख्या व यमकात थोडीशी गल्लत झालेली दिसून येते. पण साध्या माणसांच्या ओठी रूळलेली कविता अनुभवाचा अन्वयार्थ लावत ती सौंदर्यात अधिक भर घालते, यातच तिच्यातील सोज्ज्वळतेचे रहस्य दडले आहे; हे उल्लेखनीय आहे. प्रत्यय हे काव्यसंग्रहाचे शीर्षक अर्थपूर्ण व बोध्रपद असून शब्दांचे वारूळ, आयुष्याची धुनी, उजेडाची व्यथा, दुराव्याचे भाले, केशर पहाट यांसारख्या अत्यंत समर्पक प्रतिमांचा वापर कवीने मोठया खुबीने केला आहे. संग्रहातील प्रसादगुणांनी ओथंबलेले कवीचे अभंग ओजस्वीतेची साक्ष तर देतात; सहज व भावपूर्ण शब्द योजकतेमुळे काव्य चांगल्या रीतीने अभिव्यक्त होण्यासाठी अर्थोक्ती व स्वभावोक्तीची हमी देतात.
कवी प्रा. सतीश देशमुख वेणीकोठेकर यांनी ग्रामीण भाषेतील नेहमी वापराच्या शब्दांनी नवे-नवे आशयपूर्ण अर्थ प्रसवण्याचे कसब अंगीकारून आपल्यातील शब्दशक्तीचा परियच करून दिला आहे. ग्रामीण भागातील भयावह वास्तवाला वाड-मयीन कलारूप देणारे बारोमासकार डॉ. सदानंद देशमुख यांचा आशयघन ब्लर्ब हलाखीच्या दाहकतेत होरपळलेल्या प्रा. सतीश देशमुख वेणीकोठेकर यांच्या संग्रहाला लाभणे म्हणजे द्वयींच्या कंठात अजूनी शिवाराची गाणी कायम असल्याचा प्रत्यय येतो कारण त्यांची कूस व मूस आजही सृजनमातीतून अंकुरल्याची ग्वाही देते. कवीच्या पुढील साहित्य प्रवासाला हार्दिक शुभेच्छा!
पत्ता : ५२-ब, साईनगर, दिघोरी नाका, नागपूर-४४००३४
चलभाष क्र. ९४२१८०३४९८
Post Views: 239