दर्ग्याची तब्बल 405 एक्कर जमीन महसूलमधील अधिकाऱ्यांच्या संगनमताने भूमाफियांनी लाटली


 संजय देशमुख  16 Jan 2022, 1:02 PM
   

बीड : बीड जिल्ह्यातील देवस्थान आणि वक्फ बोर्ड जमीन खालसा व विक्री प्रकरणात राज्य शासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यात अनेक जमिनी खालसा केल्याचा आरोप असलेला आणि आष्टी तालुक्यातील गुन्ह्यांमध्ये आरोपी म्हणून समावेश झालेला उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. आघाव याच्या निलंबनाचे आदेश राज्य सरकारने आज काढले आहेत.
बीड जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फच्या जमिनीमध्ये मोठ्याप्रमाणावर गोंधळ झाला आहे. यासंदर्भात आष्टी तालुक्यात ३ गुन्हे दाखल असून बीडच्या शिवाजीनगर पोलिसात एक गुन्हा दाखल आहे,. यात भूसुधार विभागाचा तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.
काय आहे प्रकरण?
बीड शहरातील प्रसिद्ध शहेनशाहवली दर्ग्याला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. दर्ग्याची तब्बल 405 एक्कर जमीन बनावट दस्तऐवज बनवून, महसूलमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने भूमाफियांनी लाटली आहे. याप्रकरणी बीडमधील महसूलच्या उपजिल्हाधिकारी या सह 15 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा महसूल मधील भूमाफियांचे रॅकेट उघड झाले.
जिल्हा वक्क बोर्ड अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून, मुस्लिम धार्मिक स्थळ दर्गा, जमीन गैर व्यवहार प्रकरणी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याच्यासह,15 जणांवर गुन्हा दाखल झालाय. यामध्ये तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह भुमिअभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

खिदमतमास जमीन असताना बनावट दस्तावेज बनवून उपजिल्हाधिकारी आघाव याने मदतमास करून खालसा केली. शहरातील प्रसिद्ध शहेनशाहवली दर्गाची 796 एक्कर 37 गुंठे जमीनी पैकी 405 एक्कर 5 गुंठे जमीन, बनावट दस्तावेज तयार करून खालसा केलीय. भूमाफियांनी यामधील काही जमिनीवर प्लॉटिंग करून जमीन विकली असल्याचं देखील समोर आलं आहे.
दरम्यान, या जमिनीची किंमत कोट्यवधीच्या घरात असून या जमिनीमधून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने, तब्बल 15 कोटी रुपयांचा मावेजा शासन दरबारी पडून आहे. त्यामुळं आरोपी भूमाफियांनी हा मावेजा उचलण्यासाठी नामी शक्कल लढवली असल्याचं तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात मूळ तक्रार  सादेक बाबामिया इनामदार यांनी केली होती. दोषींवर कारवाई कायदेशीर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी महसूलमधील बड्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. आष्टी तालुक्यात 3 गुन्हे दाखल झाले असतांना 4 था गुन्हा देखील दाखल आहे.

    Post Views:  275


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व