अकोला : जिल्ह्यातील बालगृहातील अनाथ बालकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा याकरीता जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले होते. सर्व यंत्रणाच्या समन्वयाने बालगृहातील 71 अनाथ बालकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार यांच्या समन्वयातून बालगृहातील अनाथ बालकांना संजय गांधी योजनेचा लाभ देण्यात आला. या योजनेचा लाभ मिळण्याकरीता बालगृहाला भेटी देवून योजनेचा लाभ घेण्याकरीता आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे जोडावी याबाबतची माहिती दिली. तसेच योजनेबाबतच्या सर्व यंत्रणांशी समन्वय साधुन 71 अनाथ, दुर्धर आजारग्रस्त बालकांचे प्रस्ताव सेतु केंद्रामार्फत दाखल करुन प्रस्तावाला वेळोवेळी पाठपुरावा केला. संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत सुर्याद्य बालगृहांचे 50, गायत्री बालिकाश्रमाचे 14 तर आनंद बालीकाश्रमातील सात बालीका अशा एकूण 71 बालकांना संजय गांधी निराधार योजना लागू करुन बालकांच्या खात्यात प्रतिमाह 1 हजार रुपये जमा करण्यात येत आहे. प्राथमिक स्तरावर बालगृहातील पाच बालिकाना लाभ देण्यात आला. अनाथ बालिकांना संजय गांधी योजना लागू व्हावी याकरीता संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार घुगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, बाल संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर यांनी परिश्रम घेतले.