योगी सरकारची मोठी घोषणा, आता कामगारांना 2000 रुपये भत्ता


 संजय देशमुख  21 Dec 2021, 12:25 PM
   

लखनौ - उत्तर प्रदेशमधीलयोगी आदित्यनाथ सरकारने मोठी घोषणा केली आहे. अंसघटीत क्षेत्रातील मजूरांसाठी आर्थिक मदत देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे. या मजूरांना 1000-1000 रुपये दोन टप्प्यात पोषण भत्ता देणार आहे. कामगार मंत्रालयाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. उत्तर प्रदेशातील असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा बोर्ड यांच्याकडे 31 डिसेंबरपर्यंत नोंदणी असलेल्या सर्वच कामगारांना हा भत्ता मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा होत आहे.  

असंघटीत कामगारांना जानेवारीच्या पहिल्याच महिन्यात 1000 रुपयांचा पहिला भत्ता मिळणार आहे. असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा मंडळाकडून ही रक्कम देण्यात येत आहे. योगी सरकारने विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या अर्थसंकल्पात असंघटीत कामगारांना भरण-पोषण भत्ता देण्यासाठी 4000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सध्या असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा मंडळाकडे 2.5 कोटी कामगारांची नोंदणी आहे. त्यामुळे, या सर्व कामगारांना या भरण-पोषण भत्त्याचा लाभ मिळणार आहे. कामगारांच्या बँक खात्यात थेट ही रक्कम जमा होईल. 

शासन स्तरावर यासंदर्भात आदेश जारी करण्यात आला असून लाभार्थी मजुरांना आधार कार्डशी लिंक करण्याचे आदेशही मंडळाच्या सचिवांना देण्यात आले आहेत. ज्या कामगारांना शेतकरी सन्मान निधी किंवा इतर कुठलाही भत्ता देण्यात येत आहे, त्या मजुरांना या भत्त्याचा लाभ मिळणार नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वीच कामगारांना हा भत्ता लवकरात लवकर वाटप व्हावा, अशी प्रकिया सुरू आहे.  

    Post Views:  171


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व