महात्मा फुले समता पुरस्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे!- माया ईरतकर
२८ नोव्हेंबरला पुणे येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
26 Nov 2026, 11:51 AM
अकोला : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे १३६ व्या महात्मा फुले पुण्यतिथी व समता दिनानिमित्त आयोजित महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार, ता. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला अकोला, वाशिम ,यवतमाळ, अमरावती, बुलढाणा तसेच विदर्भातील जिल्ह्यातील नागरिक, समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच महात्मा फुले यांच्या विचारांचे अनुयायी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या विदर्भ विभागीय अध्यक्षा तथा राज्य अन्न आयोगाच्या सदस्या सौ. मायाताई ईरतकर यांनी केले आहे.
पुणे येथील समता भूमी, महात्मा फुले स्मारक येथे सकाळी ९.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ कवी, गीतकार व लेखक जावेद अख्तर हे प्रमुख पुरस्कारार्थी म्हणून उपस्थित राहणार असून, महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगनराव भुजबळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, नागरी उड्डाण राज्यमंत्री हेमंत रासने, बाळासाहेब शिवरकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच समता परिषदेचे प्रदेश व विभागीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरही सहभागी होणार आहेत.
महात्मा फुले यांनी समता, सामाजिक न्याय, शिक्षण आणि वंचितांच्या हक्कांसाठी दिलेला पुरोगामी विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विदर्भातील समतावादी विचारांच्या नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या विचारांना अभिवादन करावे आणि सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन मायाताई ईरतकर यांनी केले आहे.
Post Views: 34