मोफत प्रवेश अन् मराठी कलाकारांची उपस्थिती; बोईसरमध्ये ‘रासरंग दांडिया’ची धूम
बिरसा मुंडा मैदान, खैरापाडा येथे रंगणार दांडियाचा उत्सव; महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षारक्षकां
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
07 Oct 2026, 1:23 PM
देवेंद्र मेश्राम
पालघर.. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर युवा फाऊंडेशन, बोईसरच्या वतीने ‘रासरंग दांडिया २०२६’ या भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बिरसा मुंडा मैदान, खैरापाडा, बोईसर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात सर्व गरबा प्रेमींसाठी विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला आहे. बोईसर शहरात प्रथमच अशा स्वरूपाचा मोफत प्रवेशाचा दांडिया महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याने कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
कार्यक्रमात मराठी कलाकारांची विशेष उपस्थिती राहणार असून, नवरात्रोत्सवाचा उत्साह पारंपरिक दांडिया-गरब्याच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. महिलांचा मोठा सहभाग अपेक्षित असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी महिला सुरक्षारक्षकांची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
‘रासरंग दांडिया २०२६’च्या लोगोचे अनावरण भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आणि शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी तुषार संखे, तर कार्याध्यक्षपदी मुकेश पाटील यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला युवा सेनेचे पालघर जिल्हाप्रमुख सौरव आप्पा,महेंद्र भोणे, प्रशांत संखे, संदीप घरत, सुशील चुरी, अंकुर राऊळ, संतोष मराठे, चंदन सिंह, वैदेही वाढण आदी मान्यवर उपस्थित होते.
मोफत प्रवेशासह मराठी कलाकारांची उपस्थिती आणि महिलांच्या सुरक्षेची विशेष व्यवस्था हे ‘रासरंग दांडिया २०२६’चे प्रमुख आकर्षण ठरणार असून, बिरसा मुंडा मैदान, खैरापाडा येथे होणाऱ्या या उत्सवासाठी बोईसरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Post Views: 12