पत्रकाराला चावण्याची भाषा करणाऱ्या मेडशीच्या मुजोर रेंजरचे निलंबन करा!
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक मागणी; लाकूड डेपोतील कथित भ्रष्टाचाराच्या
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
14 Nov 2026, 9:45 AM
वाशिम जिल्हा (प्रतिनिधी) प्रताप नागरे :
रिसोड तालुक्यातील मेडशी येथील वनविभागाच्या लाकूड डेपोतील कथित भ्रष्टाचार आणि अनियमितता उघड करणाऱ्या वृत्तांकनाचा राग मनात धरून पत्रकाराला अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप वनपरिक्षेत्र अधिकारी (रेंजर) संतोष कुरोडे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित रेंजरला तात्काळ निलंबित करावे, अशी आक्रमक मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप नागरे यांच्या नेतृत्वाखाली १३ नोव्हेंबर २०२६ रोजी महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
मेडशी येथील वनविभागाच्या लाकूड डेपोतील दयनीय अवस्था, शासकीय लाकडाच्या सुरक्षेचा प्रश्न आणि कथित अनियमिततांबाबत विविध वृत्तपत्रांत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या वृत्तांकनानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कुरोडे यांनी पत्रकार सोयल पठाण यांना व्हॉट्सॲपवरून आक्षेपार्ह संदेश पाठवून धमकावल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
संबंधित संदेशामध्ये "तू उखाड ले जो तुझे उखाडना है... तुझे मैं bite दूंगा... जल्द ही मुलाकात होगी, वोह भी यादगार होगी," अशा धमकीवजा आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आल्याचे महासंघाने म्हटले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
*जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रमुख मागण्या*
महासंघाने सादर केलेल्या निवेदनातून संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे, पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, मेडशी येथील वनविभागाच्या लाकूड डेपोतील कथित भ्रष्टाचार व अनियमिततेची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करावी तसेच शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेबाबत जबाबदारी निश्चित करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी महासंघाच्या शिष्टमंडळाचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले असून, प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करून वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाईबाबत सूचना देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
*पत्रकारांच्या सन्मानासाठी महासंघ आक्रमक!*
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रताप नागरे म्हणाले की, "जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आमचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले आहे. पत्रकार सोयल पठाण एकटा नाही, तर संपूर्ण लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पत्रकारांनी जनहितासाठी केलेल्या वृत्तांकनामुळे त्यांना धमक्या दिल्या जात असतील, तर अशा प्रवृत्तीविरुद्ध महासंघ रस्त्यावर उतरून लढा देईल. पत्रकारांवरील अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही."
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पंडित उर्फ करण धोंगडे, भगवान वाघ, कार्याध्यक्ष प्रवीण पठेबहादूर, सचिव विनोद भालेराव, संघटन संपर्क प्रमुख शिवशंकर भोयर, सहसचिव शशिकांत जाधव, विनोद रोकडे, प्रदीप सालवणकर, कोषाध्यक्ष प्रदीप सावले, सदस्या नेहा काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 1