हभप परळीकरांची पुस्तके समाजाला दिशा देणारी!


पुस्तकांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे मोलाचे कार्य – आमदार सईताई डहाके यांचे प्रतिपादन
 विश्व प्रभात  12 Nov 2026, 8:39 AM
   

‘भोदूरहस्यम’ आणि ‘कीर्तन तरंग’ या दोन पुस्तकांचे दिमाखदार प्रकाशन...
अकोला : पुस्तकांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य घडत असते. लेखक आपल्या विचारांच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा देण्याचे काम करीत असतात. हभप अविनाशजी परळीकर यांनी लिहिलेली पुस्तके ही समाजाला दिशा देणारी असून, त्यांच्या लेखनातून वैचारिक आणि आध्यात्मिक समृद्धीचा प्रत्यय येतो, असे प्रतिपादन आमदार सईताई डहाके यांनी केले.
            अकोल्यातील पोलीस लॉन्स येथे आयोजित भव्य पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. हभप अविनाशजी परळीकर लिखित ‘कीर्तन तरंग’ आणि ‘भोदूरहस्यम’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याला संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत मंत्री विवेकजी कवठेकर, अकोला अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजनजी सोनटक्के, प्रभातचे संचालक डॉ. गजाननजी नारे, सौ.शोभाताई परळीकर,संस्कार भारतीच्या जिल्हाध्यक्ष चंदाताई जयस्वाल तसेच महानगराध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
           यावेळी बोलताना आमदार सईताई डहाके म्हणाल्या की, आपण या कार्यक्रमाला आमदार म्हणून नव्हे, तर अविनाश परळीकर हे आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य असल्याच्या जिव्हाळ्याच्या नात्याने उपस्थित आहोत. त्यांच्या साहित्यिक आणि आध्यात्मिक वाटचालीचा आनंद असून, त्यांच्या लेखनातून समाजाला निश्चितच प्रेरणा मिळेल.
संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत मंत्री विवेकजी कवठेकर आणि डॉ. गजाननजी नारे यांनीही आपल्या भाषणातून परळीकर यांच्या साहित्यिक योगदानाचे कौतुक केले. त्यांच्या लेखनातील वैचारिक आशय आणि समाजप्रबोधनाची भूमिका अधोरेखित करीत त्यांनी परळीकर यांना पुढील साहित्यनिर्मितीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात ‘कीर्तन तरंग’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे, तर ‘भोदूरहस्यम’ या पुस्तकाच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांतील आवृत्त्यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हभप अविनाशजी परळीकर यांनी प्रास्ताविकातून आपल्या लेखनामागील भूमिका, संकल्पना आणि साहित्यनिर्मितीचा प्रवास उलगडून सांगितला. अभिजीत परळीकर आणि निखिल परळीकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन नाना भडके यांनी केले.
प्रकाशन सोहळ्यानंतर रंगली तबला-पखवाजची सुरेल जुगलबंदी!
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर आयोजित उपशास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना स्वर आणि तालांच्या अनोख्या विश्वात रमविले. या मैफलीतील तबला आणि पखवाज यांची जुगलबंदी विशेष आकर्षण ठरली.
अकोल्यातील प्रख्यात शास्त्रीय गायक प्रा. डॉ. नीरज लांडे, पुण्याचे तबलावादक पांडुरंग पवार, पखवाजवादक शुभम उगले, संवादिनीवादक डॉ. सुशील देशपांडे आणि व्हायोलिनवादक हरीश लांडगे यांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून मैफलीत रंग भरला. जवळपास दीड तास रंगलेल्या या उपशास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाने उपस्थित रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
कारंजा येथील श्री लोकमान्य भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह साहित्य, कला, संस्कृती आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती होती. स्नेहभोजनाने या अविस्मरणीय साहित्य-सांस्कृतिक सोहळ्याची सांगता झाली.

    Post Views:  3


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व