सुरेश केसरकर यांची केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून नियुक्ती
राज्य गुणवंत कामगार असोसिएशनला दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करण्याची संधी
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
24 Oct 2026, 8:11 AM
कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्रच्या माध्यमातून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवून कामगार, कष्टकरी, वंचित, गरजू तसेच समाजातील विविध घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान देणारे मा. सुरेश केसरकर यांच्या समाजाभिमुख भरीव कार्याची दखल घेऊन, भारत सरकारच्या दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.
शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर रोजी पुणे येथे नूतन चेअरमन नितीन केंजळे व पुणे तसेच गोवा विभागाच्या प्रमुख अरुणा वाघ मॅडम यांच्या उपस्थितीत केंद्रीय श्रमिक बोर्डाच्या विभागीय कार्यालयात, नूतन कार्यकारीणीची पहिली बैठक पार पडली. यावेळी पुणे विभागातील संबंधित पात्र कामगारांना लाभ मिळणेकामी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणेबाबत सकारात्मक चर्चा करणेत आल्या.
या कार्यालयाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगार, शेतमजूर कामगार, अल्पभूधारक, साखर कारखाने तसेच महिला उपसा कामगार अशा विविध क्षेत्रातील कामगारांसाठी विविध उपक्रम तसेच प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून, संबंधित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाते.
सुरेश केसरकर यांच्या सातत्यपूर्ण कामगारभिमुख व समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन झालेली ही नियुक्ती, त्यांच्या सातत्यपूर्वक कार्याचा गौरव मानली जात आहे.
मा. सुरेश केसरकर हे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष असून, त्या माध्यमातून संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न, त्यांच्या हक्कांचे संरक्षण, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, गुणवंत कामगारांना योग्य प्रतिनिधित्व, सामाजिक न्याय, जनजागृती तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहेत.
समाजातील सर्व घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, कामगारांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
कामगारांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी श्रमिक शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या पार्श्वभूमीवर दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागांतर्गत कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून मिळालेली जबाबदारी, संघटीत तसेच असंघटीत तसेच दुर्लक्षीत कामगारांच्या समस्या, अपेक्षा आणि कल्याणकारी उपक्रमांना अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच या नियुक्तीमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कामगार चळवळ, सामाजिक क्षेत्र आणि गुणवंत कामगारांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर अधिक बळ मिळण्याची आशा विविध घटकांतून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील गुणवंत कामगारांचा सन्मान
दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक एवं शिक्षा बोर्डावर सल्लागार म्हणून सुरेश केसरकर यांची झालेली नियुक्ती म्हणजे वैयक्तिक सन्मान नसून, महाराष्ट्रातील सर्वच गुणवंत कामगारांचा सन्मान असून सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाची श्रमिक बोर्डाने दखल असल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे.
या नियुक्तीसाठी पुणे व गोवा विभागाच्या दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक एवं एज्यूकेशन बोर्डाच्या प्रमुख मा. अरुणा वाघ मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
मा. सुरेश केसरकर यांच्या या निवडीच्या अनुषंगाने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यीक, सांस्कृतिक, कला - क्रिडा, सेवाभावी संस्था तसेच औद्योगिक क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत असून, त्यांच्या पुढील उज्वल कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
Post Views: 19