कर्णकर्कश बुलेटच्या फटाक्यांवर रोड रोलर!


शहर वाहतूक शाखेची विशेष मोहीम ; ३५० बनावट सायलेन्सर अन् ७० फॅन्सी नंबर प्लेट्सचा चक्काचूर!
 Vishwaprabhat  11 Oct 2026, 10:10 AM
   

अकोला: रस्त्यांवर कानठळ्या बसवणारे फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या बुलेट सायलेन्सरविरोधात शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या विशेष मोहिमेदरम्यान ३५० बनावट बुलेट सायलेन्सर आणि ७० फॅन्सी नंबर प्लेट्सवर रोड रोलर फिरविण्यात आला आहे.
बुलेटला बेकायदेशीरपणे लावलेल्या बनावट सायलेन्सरमधून निघणाऱ्या प्रचंड आवाजामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा त्रास आजारी नागरिक, वयोवृद्ध, लहान मुले आणि विद्यार्थ्यांना सहन करावा लागत होता. याप्रकरणी नागरिकांकडून वाहतूक शाखेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखेसह जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. मोटार वाहन कायद्याच्या कलम १९८ नुसार, ज्या सायलेन्सरच्या आवाजाची तीव्रता ८० डेसिबलपेक्षा जास्त असते, अशा वाहनांवर वाहतूक शाखेतर्फे कायदेशीर कारवाई करत विविध कलमान्वये पोलिसांनी धडक कारवाई करत ३५० बनावट सायलेन्सर जप्त करण्यात आले. तसेच गाड्यांवर दादा, भाऊ, काका, मामा असे लिहीत बेकायदेशीरपणे वापरलेल्या ७० फॅन्सी नंबर प्लेट्सही जप्त करण्यात आल्या होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली व शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान जप्त करण्यात आलेले ३५० बनावट बुलेट सायलेन्सर आणि ७० फॅन्सी नंबर प्लेट्सवर जुने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील आम रोडवर रोड रोलर फिरवून नष्ट करण्यात आल्या आहेत.
-- कंपनीचे मूळ सायलेन्सरच वापरा, अन्यथा कठोर कारवाई!
न्यायालयाची पूर्वपरवानगी आणि पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मान्यतेने, कर्णकर्कश आवाज करणारे सायलेंसर, नंबर प्लेट सर्व साहित्याचा रोड रोलरखाली चक्काचूर करण्यात आला. वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम फत्ते करण्यात आली असून बुलेटधारकांनी आपल्या वाहनाला कंपनीकडून मिळालेल्या मूळ (कंपनी फीटेड) सायलेन्सरचाच वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले. 
-- थकीत दंड तत्काळ भरा; पोलिसांचे नागरिकांना आवाहन
वाहन चालवताना परवाना व वाहनाची मूळ कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावीत. तसेच ज्या वाहनांवर ई-चालानचा दंड थकीत (पेंडिंग) असेल, त्यांनी तो त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतूक शाखेत जमा करावा,  जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे, यापुढेही तपासणीदरम्यान बेकायदेशीर बनावट सायलेन्सर आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करून सायलेन्सर जप्त केला जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

    Post Views:  20


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व