अभिजात दर्जानंतर मराठीला ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्याची गरज : डॉ. रवींद्र शोभणे
मराठीत ८०० हून अधिक कोश; ही ज्ञानसमृद्धीची साक्ष : डॉ. रमेश अंधारे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
06 Oct 2026, 10:19 AM
अकोल्यात ‘अभिजात मराठी भाषा संमेलन’ उत्साहात संपन्न
अकोला : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा गौरवाचा टप्पा असला, तरी त्याबरोबर भाषेच्या संवर्धनाची आणि ज्ञानभाषा म्हणून तिचा विस्तार करण्याची जबाबदारीही वाढली आहे. मराठीचा वापर केवळ साहित्यापुरता मर्यादित न राहता शिक्षण, संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिक ज्ञानाच्या विविध क्षेत्रांत वाढला पाहिजे. नव्या पिढीला मराठीच्या समृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेशी जोडतानाच बदलत्या काळाशी सुसंगत अशी भाषा विकसित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई, वऱ्हाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, लोणी आणि श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित ‘अभिजात मराठी भाषा संमेलन’ शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात उत्साहात संपन्न झाले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र शोभणे होते. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, प्रा. सुरेश राऊत आणि डॉ. गजानन नारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, मराठी विभागप्रमुख डॉ. संजय पोहरे, डॉ. जगानंद भटकर आणि डॉ. रावसाहेब काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. शोभणे यांनी मराठी भाषेच्या भविष्याचा विचार करताना भाषेची समृद्ध परंपरा आणि आधुनिक काळातील तिची उपयुक्तता यांची सांगड घालण्याची आवश्यकता अधोरेखित केली. अभिजाततेचा दर्जा हा केवळ सन्मान म्हणून न पाहता मराठीतील ज्ञाननिर्मिती, संशोधन, वाचनसंस्कृती आणि नव्या पिढीपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचविण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे, असा आशय त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केला. मराठी भाषा जिवंत आणि समृद्ध ठेवण्यासाठी लेखक, संशोधक, शिक्षक, विद्यार्थी आणि समाज या सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
पहिल्या सत्रात ‘मराठी भाषेची अभिजातता आणि पुढील दिशा’ या विषयावर विचारमंथन झाले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके होते. डॉ. रमेश अंधारे, डॉ. हेमंत खडके आणि डॉ. जगानंद भटकर यांनी सहभाग घेतला. डॉ. जगानंद भटकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बदलत्या युगाकडे लक्ष वेधले. एआयच्या काळात मराठी भाषेतील साहित्य, कोश, ग्रंथ आणि इतर ज्ञानसंपदा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रमेश अंधारे यांनी मराठीतील कोशवाङ्मयाच्या समृद्ध परंपरेवर प्रकाश टाकला. मराठी भाषा ही समृद्ध ज्ञानपरंपरा लाभलेली भाषा असून मराठीमध्ये विविध विषयांवरील ८०० पेक्षा अधिक कोश उपलब्ध आहेत. ही मराठीच्या ज्ञानसमृद्धीची महत्त्वपूर्ण साक्ष आहे, असे त्यांनी सांगितले. कोश म्हणजे केवळ शब्दांचे संकलन नसून भाषा, साहित्य, संस्कृती, इतिहास आणि विविध ज्ञानशाखांचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठीच्या या ज्ञानसंपदेचा आणि शब्दवैभवाचा नव्या पिढीने अभ्यास केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. हेमंत खडके यांनी भाषांतर आणि मराठी भाषेच्या प्रादेशिक विस्ताराविषयी विचार मांडले. लिओ टॉलस्टॉय यांच्या ‘कबुलीजबाब’ या साहित्यकृतीच्या अनुषंगाने त्यांनी भाषांतराचे महत्त्व स्पष्ट केले. पाश्चिमात्य तसेच दक्षिण भारतीय भाषांच्या अभिजात परंपरांचा संदर्भ देत त्यांनी मराठीच्या अभिजाततेचे सखोल विश्लेषण केले. इंग्रजी भाषेप्रमाणेच मराठीतील शब्दांचा शिक्षण, ज्ञान आणि दैनंदिन व्यवहारात व्यापक वापर झाल्याशिवाय अभिजाततेचा खरा लाभ मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण विचार त्यांनी मांडला.
सत्राध्यक्ष डॉ. श्रीकांत तिडके यांनी “No Culture Without Agriculture” या सूत्राद्वारे त्यांनी शेती आणि संस्कृतीचे नाते स्पष्ट केले. शेतीतून केवळ अन्ननिर्मिती होत नाही, तर भाषा, लोकजीवन, परंपरा आणि संस्कृतीचेही जतन होते, असा विचार त्यांनी मांडला.
दुसऱ्या सत्रात ‘मराठी विश्वकोश वाचताना’ या विषयावर चर्चा झाली. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्रात डॉ. श्रद्धा थोरात, श्री. विजय दवळी, डॉ. राजेश मिरगे आणि डॉ. भगवान फाळके यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. मराठी विश्वकोशाचे शैक्षणिक व संशोधनात्मक महत्त्व, विश्वकोशातील ज्ञानसंपदा आणि ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला. विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांमध्ये विश्वकोश वाचनाची सवय विकसित करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
दुपारच्या तिसऱ्या सत्रातील कवी संमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ साहित्यिक प्रशांत असनारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कवी संमेलनात ज्येष्ठ कवी डॉ. बाळकृष्ण लळीत यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध भागांतून आलेल्या मान्यवर आणि सहभागी कवींनी कविता सादर करून संमेलनात साहित्यिक रंग भरला.
समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वऱ्हाडी साहित्यिक श्री. पुरुषोत्तम गावंडे होते, तर डॉ. रवींद्र शोभणे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, डॉ. संजय पोहरे, डॉ. जगानंद भटकर आणि डॉ. रावसाहेब काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, डॉ. उमेश घोडेस्वार, प्रा. डॉ. बाळासाहेब जोगदंड आणि प्रा. दिवाकर सदाशिव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
एकूणच संमेलनातून अभिजात दर्जाचा उपयोग मराठीच्या ज्ञानभाषा म्हणून विकासासाठी करणे, मराठीतील कोश व विश्वकोशीय ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, भाषांतराला चालना देणे, मराठी शब्दांचा व्यवहारातील वापर वाढविणे आणि एआयच्या युगासाठी मराठीतील ज्ञानसंपदा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे, या दिशेने व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचा सूर उमटला.
Post Views: 19