अवैध सावकाराला सहकार विभागाचा दणका; शेती बळीराजाला परत करण्याचा आदेश
पाथर्डीच्या विजय खख्खर यांचेविरूध्द कारवाई
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
03 Oct 2026, 10:02 AM
अकोला- आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींचा फायदा घेऊन अव्वाच्या सव्वा व्याजाच्या रकमा वसूल करीत दुसऱ्याच्या जीवावर जगणारे अवैध सावकार येथील समाजव्यवस्थेला लागलेली किड आहे. शेतकऱ्यांकडून व्याजाच्या रूपात मुद्दलापेक्षा जास्त पटींनी रक्कम वसूल केल्यावरही त्यांची मुळ शेती सुध्दा हडपून त्याला आणखी कंगाल करणाऱ्या अवैध सावकारांनी अनेक शेतकऱ्यांना आयुष्यातून उठवलेले आहे. अशाच एका प्रकरणात अवैध सावकारी करणाऱ्या तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील विजय मगनलाल खख्खर या सावकाराविरूध्द सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १८ (२) नुसार कारवाई करून मुळ जमिन संबंधित मालकाला परत करण्याचा आदेश अकोला सहकार विभागाने पारित केला आहे.
याबाबत शेतकऱ्यांच्या दुरावस्थेची व्यथित करणारी हकिकत म्हणजे त्याच पाथर्डी गावातील रामदास नारायण गायगोळ या शेतकऱ्याने सावकार विजय खख्खर यांचेकडून ४५ हजारांची रक्कम ५ टक्के व्याजाने घेतली होती.यासाठी त्यांना त्यांची २ हेक्टर २ आर जमिन दि.०६ जुलै २००० मध्ये दस्त क्र.८१५ नुसार खरेदी करून द्यावी लागली होती.सावकाराचा तगादा वाढल्याने त्यांनी विजय मगनलाल खख्खर, पाथर्डी,व खामगाव तालुक्यातील संदिप शेटे आणि शैलेश आखरे यांचे विरूध्द जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांचेकडे दि.२० जानेवारी २०१४ रोजी तक्रार केली होती. यामध्ये गैर अर्जदार संदिप शेटे व शैलैश आखरे यांचे विरूध्द सबळ पुरावे न सापडल्याने विजय खख्खर यांचे विरूध्द कारवाई करून करून मुळ जमिन शेतमालाकाला परत करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात सावकारांचे अकोला जिल्हा उपनिबंधक गितेशचंद्र साबळे यांनी चौकशी प्रक्रिया पूर्ण करून आदेश पारित केला.यामध्ये कु.ज्योती मलिये सावकारांचे सहाय्यक निबंधक तथा तालूका उपनिबंधक,सहकारी संस्था अकोला यांचा या चौकशी प्रकरणात महत्वपूर्ण सहभाग होता,तर कार्यालय अधिक्षक राहूल ओईंबे यांचे सहकार्य होते.अर्जदाराचे वकिल म्हणून अॕड.जी.व्ही.बोचे व अॕड.एस.बी.काळे यांनी काम पाहिले.
Post Views: 25