भिका आत्मचरित्राचे प्रकाशन, व स्नेह मिलन मेळावाचा भव्य सोहळा संपन्न !
गुलाबराव देशमुख यांनी लिहिलेले आत्मचरित्र म्हणजे जीवनातील संघर्ष, त्याग, मूल्याचा आरसा : आमदार किरण
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
17 Jun 2025, 8:38 AM
अकोला - एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, संवेदनशील अधिकारी, कवी, लेखक, आणि समाजहितासाठी कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त नायब तहसीलदार मा. गुलाबराव देशमुख (वक्टे) भोडकर यांच्या भिका या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याला आणि स्नेह मिलन मेळावा समारंभाला रविवार दिनांक १५ जून २०२५ रोजी अकोल्यात भरभरून प्रतिसाद मिळाला. मराठा मंडळ मंगल कार्यालय, रामदास पेठ येथे सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यात साहित्य, समाजकार्य, प्रशासन, राजकारण, शिक्षण, काव्य आणि मानवी मूल्यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. भिका आत्मचरित्र – जीवनातील संघर्ष आणि मूल्यांचा आरसा!
गुलाबराव देशमुख यांनी लिहिलेलं भिका हे आत्मचरित्र म्हणजे एका कष्टकरी, जिद्दी आणि मूल्यनिष्ठ आयुष्याचा आरसाच. बालपणातील हलाखी, शिक्षणाची ओढ, शासकीय सेवेतली प्रामाणिक वाटचाल, आणि निवृत्तीनंतरही समाजाशी असलेली नाळ – याचं समृद्ध दर्शन या ग्रंथात घडतं. या पुस्तकाने उपस्थितांच्या मनाला भावनिक स्पर्श केला असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किरण सरनाईक यांनी मार्गदर्शन करताना केले.
सहस्त्रचंद्रदर्शन आध्यात्मिकतेचा तेजस्वी क्षण ८० वर्षे १० महिने पूर्ण झाल्यानंतर साजरा होणारा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा म्हणजे केवळ आयुष्याचा एक टप्पा नव्हे, तर समाजासाठी समर्पित जीवनाचं गौरवकरण. गुलाबराव देशमुख यांचा हा स्नेह मिलन सोहळा त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या सौजन्याने अत्यंत आत्मीयतेने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. यावेळी 81 वृक्ष गावागावात लावण्याचा संकल्प करून ते वाटप करण्यात आले. तसेच गुलाबराव देशमुख यांची शैक्षणिक साहित्य तुला करण्यात येऊन ते साहित्य पारधी समाजाच्या मुलांसाठी चालत असलेल्या शाळेला तसेच वारकरी शिक्षण घेत असलेल्या श्रद्धा सागर अकोट येथील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला.
उत्कृष्ट पाहुणे आणि वक्तृत्वाने भारावलेला सभागृह या समारंभाचे अध्यक्ष मा. आमदार अॅड. किरणराव सरनाईक होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार अमोल मिटकरी, आमदार नितीन देशमुख, आमदार हरीश पिंपळे, ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून या सोहळ्याला वैचारिक आणि भावनिक वजन प्राप्त करून दिलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून गुलाबराव देशमुख यांना शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे तसेच वडाच्या झाडाचे पूजन व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कु. पर्णवी दिवाकर देशमुख रिधोरा यांच्या गणेश वंदना कथक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वंदना व स्वागत गीत सुप्रसिद्ध गायिका यूगेश्वरी हरणे खडकी यांनी गायन करून उपस्थितांचे मन जिंकून घेतले.
कवितेचा गारवा – अनंत विठ्ठल राऊत यांची खास सादरीकरण कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले कवी अनंत विठ्ठल राऊत यांचे काव्यसादरीकरण. मित्र वणव्यात गारव्यासारखा या कवितेने राज्यभर ओळखले जाणारे राऊत यांच्या कवितांनी वातावरण भारून टाकलं. श्रोत्यांनी टाळ्यांनी त्यांच्या प्रत्येक काव्यपंक्तीचं स्वागत केलं.
स्नेहमेळावा आणि सुस्वादु भोजन : प्रकाशन व सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर, साहित्यिक, अधिकारी, मित्रमंडळी आणि नातेवाईकांसाठी सुसंस्कृत आणि सुस्वादु स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या स्नेहसंपर्कामुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
आयोजनकर्त्यांचे उल्लेखनीय योगदान : या भव्य सोहळ्याचे आयोजन सौ. अंजिराबाई देशमुख यांच्या नेतृत्वात, सौ. सुचिता कृष्णा देशमुख, सौ. राजश्री जगदीश देशमुख, सौ. विजया सरनाईक, सौ. रंजना देशमुख, डॉ. कृष्णकांत वक्टे, अण्णा देशमुख व सर्व मित्र परिवारियक सदस्यांनी हृदयपूर्वक आणि कौशल्याने पार पाडले.तसेच किरण ग्राम विकास संस्था भोड आणि निर्भय बनो जनआंदोलन, अकोला यांचाही सक्रिय सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.
स्मरणात राहील असा सन्मान : हा कार्यक्रम म्हणजे केवळ सन्मानाचा सोहळा नव्हता, तर गुलाबराव देशमुख यांच्या जीवनमूल्यांचा आणि समाजासाठी त्यांनी उभारलेल्या प्रेरणादायी कार्याचा उत्सव होता. त्यांच्या ‘भिका’ या पुस्तकात फक्त शब्द नाहीत, तर अनेकांच्या डोळ्यांतून उतरलेलं अनुभवांचं प्रतिबिंब आहे.
उपस्थितीच मोठं दान – भेटवस्तूंशिवाय भरलेला सभागृह : कार्यक्रमासाठी ‘कोणतीही भेटवस्तू न आणण्याची’ विनंती करूनही, गुलाबराव देशमुख यांच्याविषयी असलेल्या प्रेमामुळे सभागृह हाऊसफुल्ल भरून तेवढेच लोक बाहेर उभे होते.हीच त्यांच्या जीवनप्रवासाची खरीच साक्ष आहे. हा सोहळा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, त्यांच्या जीवनमूल्यांच्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पुसटश्या स्पर्शानेही उजळलेल्या शेकडो आयुष्यांचा महोत्सव होता. कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे प्रास्ताविक समाजसेवक गजानन हरणे यांनी तर कार्यक्रमाचे संचालन जया भारती व पाथ्रीकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. कृष्णकांत वक्टे यांनी करून सर्व उपस्थितांचे आभार मानले .
Post Views: 61