अहमदनगर : देशाचे सहकारमंत्री अमित शाह यांनी आज अहमदनगरमधील प्रवरानगर येथे पहिल्यावहिल्या सहकार परिषदेला उपस्थिती लावली. यावेळी अमित शाह यांनी उपस्थितींना संबोधित करताना सहकार क्षेत्राला वाचवण्यासाठी नेमकं काय करता येईल याचा सविस्तर प्लान सांगितला. मी काही समिती वगैरे स्थापन करत बसणार नाही. आजवर भरपूर समित्या नेमल्या गेल्या आणि त्यांचे अहवाल धूळखात पडून राहिले. पण त्यावर काहीच झालं नाही. त्यामुळे सहकार चळवळ वाचवण्यासाठी आम्ही कोणत्याही समित्या स्थापन करत बसणार नाही. मी स्वत: या क्षेत्रातील विद्वान मंडळींसोबत बसून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे, असं अमित शाह यांनी म्हटलं.
सहकार क्षेत्राला काळानुरुप अनुकूल बनवावं लागेल. त्यासाठी जे काही बदल करावे लागतील ते केले जातील. सहकारी कारखान्यांचं खासगीकरण करुन चळवळ संपुष्टात आणण्याचं काम केलं जात आहे. पण ज्या प्रवरानगरमध्ये देशातील पहिल्यावहिल्या सहकारी कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली तो कारखाना आजही सहकारी पद्धतीनं चालतो आहे हे आनंद देणारं आहे. सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी आम्हाला हा कारखाना प्रेरणास्त्रोत म्हणून काम करेल. प्रवरानगरची ही जमीन सहकार क्षेत्राची काशी आहे, असं अमित शाह म्हणाले.
सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून रणनिती आखली जाईल आणि आम्ही यासाठी समित्या स्थापन करणार नाहीत तर सहकार क्षेत्राचा अनुभव असलेल्या विद्वानांसोबत काम करू. वित्त, साखर कारखाने, मार्केटिंग, दूध इत्यादी सर्वच क्षेत्रांसाठी रणनिती लागू असेल, असंही अमित शाह म्हणाले.
सहकार क्षेत्रासाठी विद्यापीठ देखील आणणार
देशात लवकरच सहकार विद्यापीठाचा स्थापन केली जाणार असल्याचंही अमित शाह यांनी यावेळी सांगितलं. तसंच मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह कायदा देखील बदलणार असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रातील सहकाराची चळवळ मजबूत आहे. तिची मुळंही खोलवर रुजलेली आहे. त्यामुळेच हे ठिकाण सहकार क्षेत्रातील काशी तीर्थक्षेत्रासारखं आहे असं मी पुन्हा एकदा आवर्जून नमूद करेन. सहकार क्षेत्रातील प्रत्येकानं या पवित्रा भूमीवर एकदा तरी भेट द्यायला हवी, असं अमित शाह म्हणाले.
Post Views: 188
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay