नाशिकमध्ये एसटी संपाचा TETच्या परीक्षार्थींना फटका; उशिरा पोहचल्यामुळे पेपर हुकला, विद्यार्थ्यांचा गोंधळ


 Sanjay M. Deshmukh  2021-11-21
   

नाशिकः राज्यभरात सुरू असलेल्या एसटी संपाचा रविवारी महाटीईटीच्या विद्यार्थ्यांना जबर फटका बसला. त्यामुळे अनेक जण परीक्षा केंद्रावर उशिरा पोहचले. तेव्हा त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. नाशिक बॉईज टाऊन शाळेत यामुळे विद्यार्थ्यांनी एकच गोंधळ केला. पालकांनीही प्रशासनावर आरोपांच्या फैरी झाडल्या. एसटीचा संप सुरू आहे. आम्ही परीक्षा केंद्रावर पोहचणार तरी कसे, आमचे नुकसान करू नका, अशी विणवणी उमेदवारांनी केली. मात्र, नियमांवर बोट ठेवून त्यांना प्रवेश नाकरण्यात आला.

43 केंद्रांवर परीक्षा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आज रविवारी महाटीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात 43 केंद्रावर तब्बल 27 हजार 721 उमेदवार परीक्षेला बसले आहेत. उमदेवारांना परीक्षा सुरू होण्यापू्र्वी प्रवेशपत्र आणि ओळखपत्रासह वीस मिनीट अगोदर हजर राहायचे होते. मात्र, एसटी संपामुळे अनेक विद्यार्थी उशिरा पोहचले. टीईटीचे दोन पेपर होत आहेत. त्यात पहिला पेपर सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 पर्यंत आहे. दुसरा पेपर हा दुपारी 2.00 ते 4.30 पर्यंत आहेत. यातल्या पहिल्या पेपरसाठी 15 हजार 144 उमेदवार आहेत, तर दुसऱ्या पेपरसाठी 13 हजार 577 जण परीक्षा देणार आहेत.

सर्व डेपो बंद

नाशिक जिल्ह्यात गेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 13 डेपोंची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करावे आणि त्यांना सहावा-सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातल्या पेठ आगारातील एका चालकाने कमी पगारामुळे आत्महत्या केली. गहिनीनाथ गायकवाड, असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गायकवाड यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर हा संप चिघळला आहे. एसटी सेवा बंद असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. खासगी वाहतूकदारांनी प्रवासाचे दर दुप्पट केले आहेत. त्यामुळे आज परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास झाला. अनेकांना पेपरला मुकावे लागले आहे.

आमची चूक काय?

अनेक विद्यार्थ्यी एसटी संपामुळे परीक्षा केंद्रावर उशिरा पोहचले. त्यांना परीक्षेला बसण्यासाठी प्रवेश नाकारण्यात आला. तेव्हा विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी एसटीचा संप सुरू आहे. खासगी वाहन मिळत नाही, आमची चूक काय, असा सवाल प्रशासनाला केला. मात्र, प्रशासनाने हतबलता व्यक्त करत नियमाकडे बोट दाखवले. या प्रकाराने विद्यार्थी प्रचंड संतापले. त्यांनी नाशिक बॉईज टाऊन शाळेत बराच वेळ गोंधळ घालत संताप व्यक्त केला.

    Post Views:  206


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व