माजी सैनिक संघटनेचे मालमत्ता करप्रश्नी जाहीर आवाहन - सुभाषराव म्हैसने
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
24 Sep 2026, 9:19 AM
अकोला : अकोला महानगरपालिकेकडून सन २००९ पासून माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सामान्य करमाफी देण्यात येत आहे. मात्र यावर्षी मालमत्ता कर वसुलीचे काम खासगी कंपनीकडे सोपविल्यानंतर अनेक माजी सैनिकांना चुकीच्या कर आकारणीच्या नोटिसा मिळाल्याचा आरोप अमर जवान माजी सैनिक संघटना, अकोला जिल्हाच्या वतीने करण्यात आला आहे.
संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने व माजी सैनिक रामरत्न बुलूकले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यापूर्वी कर वसुलीचे काम महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडे असताना माजी सैनिकांना कोणताही त्रास झाला नव्हता. मात्र खासगी कंपनीकडे काम गेल्यानंतर माजी सैनिकांच्या करमाफीसंदर्भातील शेकडो प्रकरणे प्रलंबित राहिली. अनेक माजी सैनिकांना वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागल्या असून मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला.
यानंतर संबंधित कंपनीचा ठेका रद्द झाल्यानंतर महानगरपालिकेने प्रकरणे निकाली काढली होती. मात्र यावर्षी पुन्हा कर वसुलीचे काम खासगी संस्थेकडे देण्यात आल्यानंतर कोणतीही शहानिशा न करता अनेक माजी सैनिकांच्या मालमत्तींवर कर आकारणी करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
यासंदर्भात महापौर, उपमहापौर, सभापती तसेच सर्व नगरसेवकांना निवेदन देण्यात आले असून माजी सैनिकांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. देशाच्या सेवेसाठी १७ ते २४ वर्षे सेवा बजावलेल्या आणि सध्या ६० ते ७० वर्षे वयोगटातील अनेक माजी सैनिकांना वारंवार कार्यालयीन हेलपाटे मारावे लागत असल्याबद्दल संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
नोटिसा मिळाल्यानंतर अनेक माजी सैनिक क्षेत्रीय कार्यालयात गेले असता त्यांचे अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची तक्रारही संघटनेने केली आहे. “जीआर घेऊन या” असे सांगून अर्ज न स्वीकारणे व नागरिकांना वारंवार कार्यालयात पाठविणे, अशा प्रकारे त्रास दिला जात असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
संघटनेच्या वतीने सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी, विधवा, वीर माता व वीर पिता यांना आवाहन करण्यात आले आहे की, या प्रश्नावर न्याय मिळविण्यासाठी आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल. त्यासाठी सर्वांनी संघटनेच्या संपर्कात राहून एकजुटीने तयार राहावे.
तसेच अकोला शहरातील काही धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर आकारण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या विषयाचीही प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
माजी सैनिकांच्या न्याय्य मागण्यांची तातडीने दखल घेऊन चुकीची कर आकारणी रद्द करावी व प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, अशी मागणी अमर जवान माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
Post Views: 1