गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी ‘लोकसंवाद’ अभियान


आजपासून अकोला जिल्ह्यात उपक्रमास सुरुवात; विविध कल्याणकारी योजनांची मिळणार माहिती
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  17 Sep 2026, 8:34 AM
   

अकोला  : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत असलेल्या जिल्हा माहिती कार्यालय अकोला आजपासून ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम शहरातील शास्त्रीनगर व विप्र युवा वाहिनी गणेशोत्सव मंडळापासून प्रारंभ करीत आहे.
         राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळाच्या ठिकाणी लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, या प्रमुख उद्देशाने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम 17 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे.  
             जिल्ह्यात या उपक्रमाची सुरुवात अकोला शहरातील शास्त्रीनगर येथील शास्त्रीनगर गणेशोत्सव मंडळ आणि अकोला जुने शहरातील विप्र युवा वाहिनी गणेशोत्सव मंडळापासून होत आहे. या दोन्ही मंडळात 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता लोकसंवाद उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शास्त्रीनगर गणेश मंडळाच्या ठिकाणी आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. तर अकोला जुने शहर येथील गणेश मंडळाच्या ठिकाणी जिल्हा रोजगार, कौशल्य विकास विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.
    आयुष्यमान भारत योजना, महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन-आरोग्य योजना, कौशल्य विकास क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार कर्ज योजना आदीबाबत युवक व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय महाडीबीटी, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार, आणि आपले सरकार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही जनजागृती करण्यात येणार आहे.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व