‘उंबरठ्या पलीकडचं जग’ कथासंग्रहास तापी-पूर्णा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
07 Sep 2026, 8:30 AM
अकोला : अकोला येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. अशोक शिरसाट यांच्या ‘उंबरठ्या पलीकडचं जग’ या कथासंग्रहास शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर, जि. जळगाव यांच्या वतीने देण्यात येणारा ‘तापी-पूर्णा राष्ट्रीय पुरस्कार-२०२६’ जाहीर झाला आहे. पुरस्काराचे निवडपत्र शिरसाट यांना प्राप्त झाले आहे.
येत्या ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी संतश्रेष्ठ श्री. निवृत्तीनाथ महाराज यांच्या पावन समाधीस्थळी, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे आयोजित चौथ्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
प्रा. अशोक शिरसाट यांच्या ‘उधाण’, ‘माणुसकीच्या दुबार पेरणीसाठी’ आणि ‘पोळलेले दिवस...’ या काव्यसंग्रहांसह ‘हरवलेल्या सावल्या’ कथासंग्रह आणि ‘पाखरांच्या व्याकुळ हाका’ बालकवितासंग्रहाला यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
सन २०२४ मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. भाग-३च्या मराठी पाठ्यपुस्तकात त्यांच्या ‘बाबा’ या कवितेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. ‘उंबरठ्या पलीकडचं जग’ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिरसाट यांनी शिवचरण उज्जैनकर यांचे आभार मानले. त्यांच्या या साहित्यिक सन्मानाबद्दल साहित्यिक, वाचक आणि विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
Post Views: 6