न्याबने बांधल्या कन्नूभाई वोरा अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना राख्या


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2026-09-01
   

 अकोला....... नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड  ( न्याब ) जिल्हा शाखा अकोला तर्फे आज मलकापूर अकोला परिसरात असलेल्या दि ब्लाइंड वेल्फेअर अँड रिहबिलिटेशन असोसिएशन अकोला द्वारा संचालित कन्नूभाई वोरा अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. सोबतच त्यांना मिठाई  व चॉकलेटचे ही वाटप करण्यात आले. याप्रसंगी  " न्याब " चे जिल्हाध्यक्ष प्रदीप खाडे, सचिव ऍड. नितीन गवळी, विकास अधिकारी विनोद शेगोकार, सदस्य ऍड. अरुण सौदागर, मुख्याध्यापक किशोर ठाकरे, वंदना शेगोकार प्रामुख्याने उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी वर्षाताई मीना अध्यक्ष असलेल्या या ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या कन्नूभाई  वोरा अंध विद्यालयात अकोला  " न्याब " तर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात येऊन अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येत असते. याही वर्षी आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
          याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रदीप खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून रक्षाबंधन सणाचा उगम, त्याचे महत्त्व यासोबतच विद्यार्थ्यांवरील संस्कार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक किशोर ठाकरे यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. विकास अधिकारी विनोद शेगोकार यांनी  " न्याब " राबवित  असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सचिव ऍड. नितीन गवळी यांनी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केले.
           याप्रसंगी अंध विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, परिसरातील नागरिक व अंध विद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

    Post Views:  3


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व