कल्याण: शिवसेना आणि भाजपमध्ये 472 कोटींच्या रस्ते निधीवरून चांगलीच जुंपली आहे. भाजपने रस्ते निधीवरून केलेली टीका हस्यास्पद आहे. 472 कोटींच्या निधीबाबतचे पुरावे दाखवा अन्यथा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करू असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
भाजप आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. श्रीकांत शिंदे यांनी जलमार्गा संदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित केला. त्याचं मात्र चव्हाण यांनी कौतुक केले. जलमार्गाबाबत शिंदे यांनी संसदेत जो प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल त्यांचं खरंच कौतूक केले पाहिजे. मात्र डोंबिवलीत रस्त्यासाठी 472 कोटी रुपये त्यांनी घरातून म्हणजे त्यांच्या वडिलांना सांगून द्यावे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता. त्याला शिवसेनेतून उत्तर देण्यात आलं आहे.
शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, उप जिल्हाप्रमुख राजेश कदम आणि राजेश मोरे यांनी पत्रकार आज परिषद घेऊन चव्हाण यांच्यावर पलटवार केला आहे. रवींद्र चव्हाण हे तीन टर्म आमदार आहेत. ते मंत्री सुद्धा होते. त्यांनी त्यांच्या डोंबिवली मतदार संघात काय विकास कामे केली हे जाहीर करावं असा सवालच म्हात्रे यांनी केला.
मंत्री असताना स्वत:च्या मतदारसंघाचा विकास करायचा नाही आणि दुसऱ्या शहराच्या विकास कामासाठी दौरा आयोजित करणे हे हस्यास्पद आणि अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी ज्या 472 कोटी निधीच सतत रडगाणं लावलं आहे, त्या निधीची तरतूदच एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात नाही. मग ते कोणत्या निधी बाबत बोलत आहेत? असा सवालही म्हात्रेंनी केला. एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात या रस्ते निधीची तरतूद असेल तर त्यांनी त्याचा पुरावा द्यावा. अन्यथा नागरिकांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू. तसेच निवडणूक आयोगाला तक्रार करू, असं या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
रवीद्र चव्हाण यांनी काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्याबाबतही चव्हाण यांना विचारणा करण्यात आली असता चव्हाण यांनी शिंदे यांना टोले लगावले. मोदी सरकारने प्रचारावर एक हजार कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. त्यावर आम्हीपण बोलणार. किती रुपये कुठे खर्च झाले आहेत त्याची माहिती देणार. मात्र ही माहिती योग्यवेळी देऊ, असं चव्हाण म्हणाले होते.
Post Views: 175
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay