शिवसेना पक्षप्रवेशानंतर आमदार. किरण सरनाईक यांचे अकोल्यात प्रथमच आगमन; अनिल मालगे यांच्याकडून भव्य सत्कार!
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Jul 2026, 11:54 AM
अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ना एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून
शिवसेना मध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲड. किरण सरनाईक यांचे अकोला शहरात प्रथमच आगमन झाले. या निमित्ताने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले असून, अकोला जिल्हा शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांच्या वतीने आमदार सरनाईक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशानंतर अकोला जिल्ह्यात प्रथमच आलेल्या लाडक्या आमदाराचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिक पातळीवर झालेल्या या विशेष सत्कार सोहळ्याप्रसंगी अमरावती विभागीय शिक्षक संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष दीपक बिडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अनिल मालगे यांनी आमदार सरनाईक यांच्याशी संघटनात्मक बांधणी आणि आगामी काळातील विविध जनहिताच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. आमदार सरनाईक यांच्या शिवसेेना प्रवेशामुळे अकोल्यासह संपूर्ण अमरावती विभागात पक्षाला मोठी ताकद मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याला शिवसेनेचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी,शिक्षक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच आमदार किरण सरनाईक यांना त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
Post Views: 1