सौ. सरिता वाकोडे यांनी शिवसेनेच्या समाज कार्यावर मिळविली पीएचडी
शिवसेनेवर डॉक्टरेट मिळविणारी पहिली महिला अकोल्यातील
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
04 Jun 2026, 9:19 AM
अकोला - हिंदु हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेवर तब्बल 60 वर्षांनी चक्क पीएचडी मिळविण्याचा बहुमान शिवसेनेच्या ( उबाठा ) अकोला जिल्हा महिला संघटिका सौ. सरिता विजय वाकोडे यांनी मिळविला आहे.
अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला सौ. सरिता वाकोडे यांनी शिवसेनेच्या मानवतावादी कार्याचे ऐतिहासिक अध्ययन : विशेष संदर्भ, मुंबई विभाग ( कालखंड ई. स. 1960 ते 2019 ) हा प्रबंध सादर केला होता. या प्रबंधाचा स्वीकार करून अमरावती विद्यापीठाच्या उपकुलसचिव सौ. मीनल मालधुरे यांनी सौ. सरिता वाकोडे यांना पीएचडीचे प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान केले. हा सन्मान प्रदान करते समयी व्यवसायाने शिक्षक असलेले त्यांचे पती विजय वाकोडे आवर्जून उपस्थित होते.
सुमारे 6 वर्षे अथक परिश्रम घेऊन सौ. सरिता वाकोडे यांनी हा सुमारे 1000 पानांचा प्रचंड प्रबंध आपल्या पूर्वाश्रमीच्या कु. सरला रामराव पाटील या नावाने अमरावती विद्यापीठास सादर केला होता. यासाठी त्यांना डॉ. एस. बी. डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
सरिता वाकोडे या शिवसेनेवर डॉक्टरेट मिळविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या असून त्यांच्या या कामगिरीबद्दल शिवसेना ( उबाठा ) चे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मुंबई येथे त्यांचा सत्कार करून कौतुक केले. त्यांच्या या कामगिरीबद्दल अकोल्यासह महाराष्ट्रातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले. शिवसेनेच्या महिला संघटिका असलेल्या सौ. सरिता वाकोडे यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रात अकोला जिल्ह्याची आणि शिवसेनेच्या विचारांची मान उंचावली आहे. अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे. सरिता वाकोडे या पाटील समाज महिला मंडळाच्या सुद्धा जिल्हा संघटिका असून त्यांनी महिलांच्या हिताकरिता आजपर्यंत अनेक उपक्रम राबवून आंदोलने सुद्धा केली आहेत. पाटील समाजातील महिलेच्या या कामगिरीबद्दल पाटील समाजाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर तथा सचिव प्रदीप खाडे व इतरही पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Post Views: 14