मराठी भाषा रक्षण समिती, इंदौरचे गरिमामय आयोजन


लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मध्यप्रदेश संपर्क प्रमुख उमेश थोरात सन्मानित
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  15 Apr 2026, 1:29 PM
   

कला, साहित्य आणि संस्कृतीच्या संरक्षण व संवर्धनासाठी कार्यरत मराठी भाषा रक्षण समिती, इंदौर यांच्या वतीने आयोजित त्रिदिवसीय स्मृती समारोह व सांस्कृतिक महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखात प्रीतमलाल दुआ सभागृह, रीगल चौक, इंदौर येथे संपन्न झाला. हा कार्यक्रम पद्मभूषण स्वर्गीय तात्यासाहेब सरवटे आणि स्वर्गीय राजकवि गोविंदराव झोकरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आला होता.
१२, १३ आणि १४ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडलेल्या या महोत्सवात साहित्य, कला आणि संस्कृतीचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. १२ एप्रिल रोजी नामवंत चित्रकार स्वर्गीय शंकरराव (भैया) खेर यांच्या स्मरणार्थ चित्र, शिल्प व छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन तीनही दिवस खुले ठेवण्यात आले होते, ज्यास कला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
१३ एप्रिल रोजी आयोजित कवी संमेलन हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला. जलगाव येथील प्रख्यात कवी श्री सुधीर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संमेलनात विविध मान्यवर कवींनी आपल्या रचनांद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
१४ एप्रिल रोजी इंदौरचे युवा साहित्यिक, वऱ्हाडी बोलीभाषेचे अभ्यासक आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मध्यप्रदेश संपर्क प्रमुख श्री उमेश थोरात यांना वऱ्हाडी बोलीभाषेच्या संवर्धनासाठी, साहित्य निर्मितीसाठी व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल वर्ष २०२६ चा प्रतिष्ठित “पद्मभूषण स्व. तात्यासाहेब सरवटे आणि स्व. गोविंदराव झोकरकर स्मृती पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा सन्मान सुप्रसिद्ध गझल सम्राट पं. भीमराव पांचाळे (मुंबई) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सन्मानामुळे उमेश थोरात यांच्या कार्याची दखल घेण्यात आली असून, युवा पिढीला मातृभाषा आणि बोलीभाषा जपण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. यावेळी देशभरातील कला, साहित्य, नाट्य आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान पं. भीमराव पांचाळे यांनी मराठी, हिंदी आणि उर्दू गझलांची अप्रतिम मैफल सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तबल्यावर श्री सारंग लासुरकर तर हार्मोनियमवर श्री राजेंद्र नागले यांनी उत्कृष्ट साथ दिली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पं. भीमराव पांचाळे तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ. पुरुषोत्तम सप्रे, डॉ. संजय दहाड आणि राधिका इंगळे उपस्थित होते. हा संपूर्ण महोत्सव मराठी भाषा, संस्कृती आणि बोलीभाषांच्या जतनाचा प्रभावी संदेश देणारा ठरला. मातृभाषा आणि लोकभाषांचे संवर्धन हेच सांस्कृतिक ओळखीचे मूळ आहे, हा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक अनिल धडवईवाले आणि रामराव देशमुख यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांचे योगदान मोलाचे ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रीकांत तारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन समितीचे अध्यक्ष श्री अनिल धडवईवाले यांनी केले.

    Post Views:  2


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व