अकोल्यात रामशक्तीचा महास्फोट; 501 विद्यार्थ्यांच्या शंखनादाने शहर गुंजणार


 विश्वप्रभात  30 Dec 2025, 6:43 PM
   

अकोला : अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या नवसाकार मूर्तीच्या पुनर्स्थापनेच्या 10 लाख 19 हजार 520 सेकंदांच्या पावन पूर्णतेनिमित्त अकोल्यातील जठारपेठ येथील बिर्ला राम मंदिरात उद्या, बुधवार दि. 31 डिसेंबर 2025 रोजी भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत सकाळी 9 वाजता अकोल्याच्या इतिहासात प्रथमच 501 विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र येऊन 50 मिनिटांचा विराट शंखनाद करणार असून, या शंखनादाने संपूर्ण शहर रामनामाने दुमदुमून जाणार आहे. या आध्यात्मिक नादातून प्रभू श्रीरामांच्या स्मरणाची दिव्य ऊर्जा सर्वत्र प्रसारित होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. शंखनादानंतर तत्काळ 24 तास अखंड रामनाम जप सुरू होणार असून तो 31 डिसेंबर 2025 सकाळी 9.00 ते 1 जानेवारी 2026 सकाळी 9.00 या कालावधीत अखंडपणे चालणार आहे. नववर्षाची सुरुवात प्रभू रामाच्या नावाने करण्याचा हा भक्तीमय सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. बिर्ला राम मंदिराने गेल्या वर्षभरात राबवलेल्या विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे मंदिर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र बनले आहे. त्याच परंपरेत आता महाराष्ट्रात प्रथमच 501 विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक शंखनाद साकारत असल्याचे आयोजकांनी सांगितले. या ऐतिहासिक व आध्यात्मिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अकोल्यातील सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अँड धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प वतीने करण्यात आले आहे.

    Post Views:  15


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व