अष्टपैलू गायिका - उषाताई मंगेशकर...!


 संजय देशमुख  15 Dec 2021, 11:21 AM
   

एक लाजरा न् साजरा मुखडा, काय बाई सांगू, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, शालू हिरवा, मुंगळा, मैं तो आरती उतारू रे... यांसारखी असंख्य अजरामर गीतं आपल्या मधुर आवाजात गाणा-या अष्टपैलू जेष्ठ गायिका उषाताई मंगेशकर यांचा संगीतप्रवास अलौकिक असाच आहे.  आजच्या दिवशी १५ डिसेंबर १९३५ रोजी त्यांचा जन्म झाला.  मराठी, हिंदीसह गुजराती व नेपाळी भाषेतही गायन केलेल्या उषाताईंनी भक्तीगीतं, भावगीतं, लोकसंगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंतच्या सर्वच प्रकारांत आपली सुरेल मैफल उमटवली आहे.  लतादीदी आणि आशाताई यांची असंख्य गाणी रसिकांच्या मनात रुळलेली आहेत.  परंतु या दोघींची छोटी बहिण गायिका उषा मंगेशकर यांची मोजकीच गाणी रसिकांना माहीत असावीत.  
उषाताईंना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी मॉं या हिंदी चित्रपटासाठी गायलेल्या गाण्यांमुळे.  मैं तो आरती उतारू रे... या गाण्याकरीता त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं होतं.  नंतर त्यांचं मुंगळा हे हिंदी चित्रपटातील गीत व पिंजरा या चित्रमहर्षी- व्ही. शांताराम दिग्दर्शित चित्रपटातील सर्वच गीत त्यांनी गाऊन अजरामर झाली.  प्रसिद्ध मराठी रंगमंच अभिनेते, नाट्य संगितकार व शास्त्रीय गायक पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्या उषाताई सर्वात धाकट्या कन्या.  लतादीदी, आशाताई भोसले, मीना खाडीकर यांची सगळ्यात लहान बहीण व भाऊ संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांची मोठी बहीण म्हणजे उषाताई मंगेशकर.  उषाताईंनी ७० व ८० च्या दशकात दादा कोंडके यांच्या ग्रामीण चित्रपटांसाठी गायलेली सर्वच मराठी गाणी आणि राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्यांना रसिकांची विशेष दाद मिळाली.  त्यांनी गायलेल्या लावण्या व त्यातील विशिष्ट जागी घेतलेल्या गावरान ठसक्यांना खरोखरच तोड नाही.  खासकरून पिंजरा व सोंगाड्या चित्रपटात गायलेली गाणी अजरामर झाली आहेत.  तसंच त्यांनी गायलेली असंख्य भावगीतं आणि भक्तीगीतंही अतिशय लोकप्रिय आहेत.  विविध भाषांमध्ये गाणी गाऊन उषाताईंनी भारतीय चित्रपट संगीत व संगीत क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटवला आहे.  कोणत्याही प्रसिद्धीचा लोभ न करता उषाताई आपली संगीत साधना करीत राहिल्या.  महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा  गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांंना सन्मानित करण्यात आलं आहे.  अनेक संगीतकारांनी त्यांच्याकडून वेगवेगळ्या धाटणीची गाणी गाऊन घेतली व ती खुप गाजली.  १९७५ साली जय संतोषी मॉं चित्रपटातील भक्तीगीतं गायल्यानंतर त्या पाश्वगायिका म्हणून चर्चेत आल्या.  संगीत क्षेत्रात आपला मानाचा ठसा उमटवणा-या अष्टपैलू गायिका उषाताईंना जन्मदिनानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा.
स्मिता दळवी, खारघर, नवी मुंबई
९८३३८६४८८४

    Post Views:  289


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व