हुतात्मा शौर्यगाथेचा राज्यस्तरीय समरगीत स्पर्धा उपक्रम बंद!


क्रांतीदिनी आयोजनाची कामगार कल्याण मंडळाची ४० वर्षाची परंपरा खंडीत .....कामगार कलावंतात नाराजी
 विश्वप्रभात  10 Aug 2025, 9:42 PM
   

मंडळाचे स्वयंघोषित मी तारणहार म्ह‌णणाऱ्या कल्याण आयुक्त रविराज इळवे यांचा निर्णय !
मुंबई - (विशेष प्रतिनिधी) फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर बलशाली देशातील महान‌ क्रांतीकारक शुरविर हुतात्म्यांच्या शौर्यगाथा तेवत ठेवण्यासोबतच त्या उजागर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून ४० वर्षापासून ९ ऑगष्ट या क्रांतीदिनी राज्यस्तरीय कामगार समरगित - स्फूतीगीत स्पर्धा हा अभिनव उपक्रम सुरु होता. राज्यातील कामगार कलावंत या स्पर्धेत सहभागी होत आपल्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करीत होते. देशभक्तीला प्रेरणा देणारा हा उपक्रम मंडळाचा मी तारणहार  म्हणवणारे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी यावर्षी बंद ठेवला आहे. राज्यस्तरीय स्पर्धा उपक्रम बंद करण्याचा स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांच्या शौर्याप्रती कृतघ्नपणा दर्शविणारा निंदनीय निर्णय घेतला आहे. यापुढे ह्या स्पर्धा मर्यादित गटस्तरावर होणार आहेत. त्यामुळे कामगार कलावंतामध्ये तिव्र नाराजी  व्यक्त केली जात आहे. 
       गेल्या ५ वर्षापासून प्रतिनियुक्तीच्या सर्व शासन सेवा नियम मापदंडाला फाटा देत वारंवार प्रतिनियुक्तीच्या कार्यकाळाला मुदत वाढ मिळवून घेण्यात यशस्वी ठरलेले कल्याण आयुक्त रविराज इळवे यांचा कार्यकाळात त्यांच्या हम करेसो कायदा या स्वभाव गुणांमुळे ते वादग्रस्त ठरले आहेत ! त्यांची कार्यशैली मंडळाच्या ध्येय धोरणाच्या विपरीत राहिली आहे ! त्याकारणाने त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत ! त्याची दखल प्रसार माध्यमांनी घेऊन या मंडळातील गैरव्यवहार, प्रशासकीय भ्रष्टाचार, अनियमितता अशा असंख्य गंभीर गैरप्रकाराची लक्तरे शासन दरबारी वेशीवर टांगली आहेत. इळवे यांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक आर्थिक 
बाबींच्या अनियमितता तसेच त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे मंडळाचा प्रशासकीय समतोल बिघडला आहे !त्यामुळे या मंडळामध्ये फिक्सर अधिकाऱ्यांचा व भ्रष्ट विभाग प्रमुख, तसेच कामगार कल्याण अधिकारी यांचा मुक्त आर्थिक लूटमारीचा मुक्त संचार पहावयास मिळत आहे. त्यावर इळवे यांनी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मात्र या संपूर्ण प्रकाराला कदाचित इळवे यांची मौखिक संमती असावी त्यामुळे या मंडळाचा कार्यभार अर्ध्यात तुम्ही आणि अर्ध्यात आम्ही  अशाच प्रकारचा सुरू असल्याचे चित्र संपूर्ण राज्यभर पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कामगार कल्याणाचे उद्देश आणि  तशा दृष्टिकोनाची अंमलबजावणी लोप पावल्याचे दिसून येत आहे. 
     कल्याण आयुक्त इळवे हे मंडळातील काही फिक्सर अधिकाऱ्यांच्या आहारी गेल्यामुळे आणि त्यांच्या प्रलोभनाला बळी पडल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणीत आले आहेत ? त्यामुळे या मंडळाची उज्वल प्रतिमा निश्चितच मलीन झाली, नव्हे होत आहे असे म्हणण्यास  मोठा वाव आहे. तशात गेल्या ४० वर्षापासून कामगार कल्याण मंडळाकडून अविरतपणे ९ ऑगष्ट या क्रांतीदिनी होणारी राज्यस्तरीय कामगार समरगीत - स्फूर्तीगीत स्पर्धा या वर्षी पासून बंद करण्याचा निंदनीय निर्णय घेतला गेल्याने राज्यातील कामगार कलावंताचा हिरमोड झाला आहे. 
          संपूर्ण राज्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे १९ ते २०  गट कार्यालय कार्यरत आहेत. माहे जुलै महिन्यामध्ये गटस्तरीय कामगार समरगीत, स्फूर्तीगीत स्पर्धा घेतल्या जात होत्या. त्या स्पर्धेत अनेक कामगार कलावंतांचे संघ सहभागी होऊन आपला कलाविष्कार सादर करीत होते. त्या संघात दर्जेदार स्पर्धा होऊन त्यामध्ये प्रथम क्रमांकांचा मानकरी संघ राज्यस्तरीय समरगीत / स्फूर्तीगीत स्पर्धेत सहभागी होत होता. त्यामुळे कामगारांच्या कलागुणांना वाव देण्यात येत होता. या स्पर्धेच्या निमित्ताने महान क्रांतीकारी शुरविर हुतात्म्यांना अभिवादन करीत त्यांच्या शौर्यगाथा समाजासमोर याव्यात, तसेच युवापिढीवर देशभक्तीचे संस्कार व्हावे हा   मंडळाचा उदात्त दृष्टीकोण होता.या आयोजित राज्यस्तरीय  या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या संघातील कलावंताचा मंडळाकडून मान सन्मान करीत रोख रक्कम पुरस्कार, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन  सन्मान केला जात होता. त्यामुळे कामगार कलावंत मोठ्या संख्येने सहभागी होत होते. त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे संवर्धन सुद्धा होत होते. ही स्पर्धा त्याच्यात उत्साह निर्माण करण्याचे माध्यम होते. 
          सध्याच्या यांत्रीक युगात संस्कृती टिकविणे हे समाजासमोरचे आवाहन आहे. तशात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गेल्या ७३ वर्षापासून विविधांगी कल्याणकारी उपक्रम योजना राबवित आपल्या महान संस्कृतीला तेवत ठेवण्याचे अथक प्रयत्न करीत आहे. त्यास समाज मान्यता देखील मिळाली आहे.  या मंडळाचे कार्य वृद्धिगत  करण्यासाठी न्यायव्रती कल्याण आयुक्तांची गरज आहे ! गेल्या ५ वर्षांपासून नियमबाह्यरित्या प्रतिनियुक्तीवर ठाण मांडून असलेले विद्यमान  कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या कार्यकाळात राज्यभर कार्यरत असलेले कामगार कल्याण केंद्र, गट कार्यालय, विभागीय कार्यालय ओस पडले आहेत ! याबाबत  वस्तूस्थिती जाणून खात्री करून घेण्यासाठी  प्रत्यक्ष भेटी देऊन सत्त्य जाणून घेणे आवश्यक आहे.  तेव्हाच कल्याण आयुक्त इळवे यांचा मंडळाचा खरा तारणहार म्हणणारा बनावटपणा उघड होईल ! पारदर्शक शासनाची ग्वाही देणारे कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री ना. आशिष जयस्वाल, प्रधान सचिव कामगार आय. ए. कुंदन हे इळवे यांच्या कार्यकाळातील गंभीर तक्रारींविषयी गप्प का ? शासनाकडे प्रलंबित गंभीर तक्रारींची दखल घेण्याएवढी सुद्धा नैतिकता मंत्रालयीन कामगार विभागाकडे शिल्लक राहिली नाही ! अशीच परिस्थिती दिसून येत आहे. 
         कल्याण आयुक्त इळवे यांच्यावरील निष्क्रिय, नीती भ्रष्ट असे असंख्य आरोप होऊन त्याविषयी झालेल्या तक्रारींच्या चौकशा शासन दरबारी दडून पडलेल्या आहेत. त्यामध्ये सुधारणा करावयाची झाल्यास मंडळाच्या कल्याण आयुक्त या मुख्य प्रशासकीय पदावर   न्यायव्रती व सेवाव्रती व्यक्तीची नेमणूक होणे गरजेचे आहे, परंतु प्रतिनियुक्तीचे संपूर्ण प्रशासकीय निकष डावलून ५ वर्षाचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ  संपुष्टात आल्यानंतर पुन्हा प्रतिनियुक्तीच्या  नियमांना छेद देण्यासाठी इळवे यांनी आपला पुन्हा १ वर्षाचा सेवाकाळ वाढवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न चालविल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी साम, दाम, दंड व भेद याचा वापर करून कामगार मंत्र्यासह मंत्रालयीन कामगार विभागाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करीत आहेत, असे आरोप सुद्धा मंडळाच्या काही अधिकारी वर्गाकडून होत असल्याची माहिती आहे. 
      मंडळाच्या कल्याणकारी दृष्टिकोनाला खिळ देण्याचे कार्य   होत असल्या कारणाने संपूर्ण राज्यातील मंडळाच्या कार्याची दयनीय अवस्था झाली आहे ! मंडळाचे ७ विभागीय कार्यालय, १९ गट कार्यालय आणि २४० कामगार कल्याण केंद्रे तसेच मंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत असलेले प्रकल्प सक्षम नेतृत्वाच्या अभावामुळे ओस पडले आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा वस्तूस्थिती जाणून आढावा घेण्यासाठी  लोकप्रतिनिधी म्हणवून घेणारे कामगार मंत्री तसेच मंत्रालयीन कामगार विभागाच्या प्रधान सचिव यांनी  हिम्मत दाखवून संयुक्त दौरे करावेत. अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर मुंबईचे उपाध्यक्ष बाळासाहेब केंजळे यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे.  यावर्षी क्रांतीदिन ९ ऑगस्ट २०२५ रोजी कामगार समरगीत / स्फूर्तीगित स्पर्धा फक्त गट स्तरावर आयोजित करण्यात येईल, असे लेखी आदेश कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी दि. ११ जुलै २०२५ रोजी गट अधिकाऱ्यांना दिले आहेत. तर मंडळ प्रशासन विभागाने दि. १५ जुलै २०२५ रोजी काढलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रम सुचिमधून राज्यस्तरीय समरगित/ स्फूर्तीगीत स्पर्धा कार्यक्रम वगळला आहे. त्यामुळे मंडळाच्या कर्मचाऱ्यामध्ये सुद्धा कल्याण आयुक्त इळवे यांच्या भूमिकेविषयी अनेक तर्क विर्तक वर्तविले जात आहेत. अशाच पद्धतीने मंडळाचा कारभार कागदोपत्री  सुरू राहिल्यास भविष्यात या  मंडळाची गरज कामगारांसाठी राहाणार नाही एवढे मात्र खरे....!

    Post Views:  74


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व