ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी उद्या मुंबईत चित्ररथाचे आयोजन – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती


 Chief Editor  13 Dec 2021, 8:49 PM
   

मुंबई, दि. 13 : महाऊर्जातर्फे दरवर्षी दि. 14 डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस व दि. 14 ते 20 डिसेंबर हा कालावधी ‘ऊर्जा संवर्धन आठवडा’ राज्यात साजरा केला जातो. याचे औचित्य साधून महाऊर्जातर्फे जनसामान्यात ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती करण्याच्यादृष्टीने ऊर्जा संवर्धन चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्ररथाचे उद्घाटन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, यांच्या हस्ते दिनांक 14 डिसेंबर, 2021 रोजी 10:30 वाजता मुंबई येथे घेण्यात येणार आहे. या चित्ररथाद्वारे राज्यातील विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयीची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या चित्ररथावर लावलेल्या पोस्टर्सद्वारे सर्वसामान्यांना ऊर्जा बचतीचा संदेश देण्यात येणार आहे. तसेच ऊर्जा बचतीचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.

राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पारितोषिक कार्यक्रम (State Level Energy Conservation Award) – महाऊर्जातर्फे राज्यात ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा व्यवस्थापन यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पारितोषिक योजनेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी या योजनेमध्ये 17 विविध क्षेत्रामधून विविध घटक (औद्योगिक, व्यावसायिक इमारती, शासकीय इमारती, लघु व मध्यम उद्योग, एमआयडीसी इ.) सहभागी होतात. 16 व्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन कार्यक्रमांतर्गत एकूण 78 घटकांनी सहभाग नोंदविला असून 46 विजेत्यांची यादी महाऊर्जा संकेतस्थळावर ऊर्जा संवर्धन दिन दि. 14 डिसेंबर, 2021 रोजी जाहिर करण्यात येणार आहे.

रेडिओ जिंगलद्वारे जनजागृती – राज्यातील आकाशवाणी, रेड एफ.एम. व 91.1 एफ.एम. या रेडिओ चॅनलद्वारे ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान एक मंत्र आणि एक विचार, वीज बचतीचा करु प्रसार…. या रेडिओ जिंगलचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा संवर्धनाची जनजागृती – राज्यातील विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृतीसाठी पोस्टर्स व बॅनर्सचे वितरण महाऊर्जा विभागीय कार्यालयांमार्फत ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान करण्यात येत आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती – महाऊर्जामार्फत राज्यातील 400 शाळांमध्ये ऊर्जा क्लबची स्थापना करण्यात आली असून ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती करण्याच्यादृष्टीने चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा इ. चे आयोजन करण्यात येत आहे.

ऊर्जा संवर्धनावर आधारित Graffity / Wall painting चे आयोजन – वास्तुविशारद / कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धनावर आधारित Graffity / Wall painting चे आयोजन करण्यात आले असून त्यातून निवड केलेले चित्र महाऊर्जा कार्यालयाच्या भिंतीवर रंगविण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच इतर शासकीय / निमशासकीय कार्यालयांच्या भिंतीवर सदर चित्रे रंगविता येणार आहेत.

विविध घटकांसाठी क्षमता बांधणी कार्यक्रम – राज्यातील विविध घटकांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी क्षमता बांधणी कार्यक्रमांतर्गत दृकश्राव्य माध्यमातून वेबिनारचे आयोजन ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान करण्यात येत आहे.

अभियांत्रिकी / औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा परीक्षण संयंत्राचे प्रदर्शन शिबीर – अभियांत्रिकी / औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संवर्धन संयंत्राची माहिती होणेसाठी तसेच ऊर्जा परीक्षणासाठी या संयंत्राचा वापर कशाप्रकारे केला जातो याची संक्षिप्त माहिती देण्यासाठी, महाऊर्जा मुख्यालयात ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान ऊर्जा परीक्षण संयंत्राचे प्रदर्शन शिबीर आयोजित करण्यात येत आहे.

    Post Views:  189


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व