देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती : डॉ. गजानन मालोकार
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
25 Feb 2025, 8:25 AM
श्रीधरराव देशमुख उर्फ मालक यांचे पहिले दर्शन केव्हा झाले हे आठवत नाही. ते महत्त्वाचे सुद्धा नाही. परंतु आजही आठवतो तो त्यांचा गोरापान, देखणा चेहरा आणि गांधीजींच्या चेहऱ्यावर असते तसे लहान मुलासारखे निरागस आणि निर्मळ हास्य. अर्ध शतकापूर्वी बाळापुर तालुक्यामधील निंबा हे तसे आडवळणाचे गाव. आजूबाजूची पाच पंचवीस खेडी तर अजूनही दुर्गम आणि दुर्लक्षित. परंतु ही सर्व खेडी निंब्याला गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे जोडलेली. आजच्या स्विगी, झोमॅटो, अमेझॉन वगैरे ऑनलाईन कंपन्या व प्रचंड चकचकीत सप्ततारांकित मॉल मधून खरेदी करणाऱ्या पिढीला आठवडी बाजार ही संकल्पना व त्याचे ग्रामीण जीवनामधील स्थान व महत्त्व समजणार सुद्धा नाही. ते सत्तर चे दशक होते. स्वातंत्र्य मिळून जेमतेम दोन दशकेच झाली होती. संपूर्ण देशच धडपडत चाचपडत प्रगतीच्या मार्गावर लागला होता. संपूर्ण पंचक्रोशी मध्ये प्राथमिक शिक्षणाशिवाय शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. विज नसल्यामुळे रात्री सात वाजता सगळे व्यवहार थांबून संपूर्ण गावे अंधारात विलीन होत होती. निंबा फाटा ते निंबा हा एक गिट्टी मुरमाचा रस्ता सोडला तर सगळी गावे शेतातील पायवाटा किंवा गाडरस्ते यांनी निब्यांला जोडलेली.
चार सहा महिने प्रचंड कोसळणारा पाऊस व सर्वत्र झालेला चिखल यामुळे चपला वापरता येत नव्हत्या. त्यामुळे बाकीचे दिवस कोणालाच चपला वापरायची सवय नव्हती. पंचक्रोशी मध्ये कमालीचे दारिद्र्य. पूर्ण बाह्या आणि कॉलर असलेले शर्ट घालणे ही अपूर्वाई. कोणी पाहुणे आले किंवा बाहेरगावी जायचे असेल तरच शर्ट घालायची चैन. नागमणी ब्रँडचे जाड्याभरड्या कापडाची मोठ मोठे खिसे असलेले दोन बनियन शिवले म्हणजे त्यावरच वर्ष निभवायचे. पावसाळ्यामध्ये तीन-चार दिवसाची झड नेहमीच लागायची. या दिवसात शेतीवरील काम बंद असल्यामुळे मजूर वर्गाची शब्दशः चार चार दिवस उपासमार व्हायची. असा सगळा दरिद्री अभावग्रस्त मूलभूत सुविधा नसलेला माहोल. विद्यार्थ्यांचे जीवन तर अजूनच खडतर. परंतु या सर्व हाल अपेष्टांनी कुणालाच वाईट वाटत नव्हते कारण तुलना करण्यासाठी किंवा असूया उत्पन्न होण्यासाठी आजूबाजूला सुखी संपन्न उदाहरण नसायचे. अशा सामाजिक, आर्थिक परिस्थितीमध्ये मी १९७१ ला नागद वरून निंब्याला पाचव्या वर्गात प्रवेश घेतला.
आजूबाजूच्या सर्वच खेड्यांमध्ये फक्त जिल्हा परिषदेच्या चौथीपर्यंतच्याच शाळा होत्या. त्या सुद्धा एक शिक्षकी किंवा दोन शिक्षकी. नागद वरून दररोज सकाळी आम्ही काही विद्यार्थी निंब्याला शिवाजी हायस्कूलला जात असायचो. एक दिवस निंब्यांजवळ पोहोचल्यानंतर पांढरे शुभ्र कपडे घातलेल्या, देखण्या, गौरवर्णीय, चेहऱ्यावर निर्मळ, निरागस हास्य असलेल्या, मध्यमवयीन गृहस्थाने आम्हाला थांबविले. अतिशय आपुलकीने व आत्मीयतेने चौकशी केली. प्रत्येकाचे नाव, कोणत्या वर्गात शिकता, शिकवलेले समजते का, वडिलांचे नाव, हे सर्व विचारले. प्रत्येकाच्या वडिलांना ते ओळखत होते. त्या असमंजस वयात सुद्धा प्रकर्षाने जाणवला तो त्यांचा अकृत्रिम जिव्हाळा व आपुलकी. ते गेल्यानंतर आमच्यापैकी सीनियर विद्यार्थ्यांनी त्यांना मालक म्हणतात व आपण त्यांच्याच शाळेत शिकतो हे सांगितले.
शिवाजी विद्यालयाला त्यावेळेस शिवाजी विद्यालय म्हणून ओळखत नव्हते तर श्रीधर बापूंची शाळा म्हणून ओळखल्या जायचे. नंतरची सहा वर्षे त्यांची वेगवेगळ्या कारणाने भेट होत राहिली. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी किती आदर व श्रद्धा आहे हे कायम मनात ठसत राहीले. परंतु त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वात एक नैसर्गिक जिव्हाळा असल्यामुळे त्यांच्या मोठेपणाचे दडपण कधीही जाणवत नव्हते. खरंतर मालक नसते तर निंबा आजसुद्धा आजूबाजूच्या खेड्यांसारखं अप्रगत व आडवळणी गाव राहिलं असतं. श्रीधररावांकडे पिढीजात चालत आलेली प्रचंड मोठी मालगुजारी व जमीनदारी.
महाराष्ट्रा मधील जमीनदार वर्गाला स्वस्वार्थापलीकडे पाहण्याची फारशी दृष्टी नव्हती. मराठी सिनेमाने जमीनदार वर्गातील तरुणांची अत्यंत बदनामकारक व अतिशयोक्त प्रतिमा उभी केलेली. परंतु मालक या सगळ्यांना अपवाद. बुडती हे जन न देखवी डोळा किंवा ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती ही त्यांची संत कुळामधील मूळ प्रवृत्ती. निंब्यांला असलेल्या सर्व आधुनिक सुविधा ही त्यांचीच देण. आपली सर्व साधने आणि ऊर्जा त्यांनी पंचक्रोशी मधल्या लोकांच्या भल्यासाठीच वापरली. त्या मालगुजारी काळात सुद्धा शिक्षण हीच गरिबांची खरी संपत्ती हे मूल्य त्यांनी ओळखलं होतं. म्हणूनच स्वखर्चाने त्यांनी विद्यालय सुरू केले. सर्वांच्या आरोग्याची काळजी म्हणून प्रयत्नपूर्वक प्राथमिक उपचार केंद्र निंब्यांला सुरू केले. शेतकऱ्यांच्या व जनतेच्या सोयीसाठी बँकेच्या शाखेची स्थापना केली. भूमिहीन, पददलीत, सर्वहारा जनतेच्या मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृहाची सोय केली. त्यांनी केलेल्या समाजकार्याची यादी अंतहीन आहे.
देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे । ।
या कवी बा. भ. बोरकरांच्या अर्थसघन ओळी जणू त्यांना पाहूनच लिहिलेल्या.
त्यांचा सामाजिक जिव्हाळा व लोकांसाठीची कळकळ संसर्गजन्य होती. दहावीला बोर्डाची परीक्षा व्हायची. परीक्षा कठीण असल्यामुळे व त्या परीक्षेवर विद्यार्थ्यांचे भविष्य ठरत असल्यामुळे परीक्षेचे विशेष महत्त्व होते. मालकांच्या प्रेरणेने आम्हाला दहावीला शिकवणारे तांगडे सर, दुबे सर, माळी सर, बकाल सर, तायडे सर वगैरे सर्व गुरुवर्यांनी नेहमीच्या वेळे व्यक्तिरिक्त शाळेत विशेष तयारी म्हणून रात्रीचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे खोली करून निंब्याला राहणे आवश्यक होते. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती खोली करून राहण्यासाखी नव्हती, त्यांची मालकांनी वस्तीगृहा मध्ये विनामूल्य व्यवस्था केली होती. आज बरेचसे विद्यार्थी आपापल्या पायावर सुस्थितीमध्ये उभे आहेत. काहींनी मोठी गगन भरारी घेतली आहे याचे सर्व श्रेय श्रीधरराव बापूना आहे.
श्रीधरराव बाप्पू उर्फ मालक ह्यांचा जीवनकाळ अत्यंत गतिमान राहिला. त्यांनी निंबा ह्या गावाची सर्वार्थाने भरभराट केली आणि निंबेकरांचे जीवनमान उंचावण्याकरिता अथक प्रयत्न केले. निंबा परिसरात त्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा आणि पाऊल खुणा जागोजाग दिसतात. रयत सुद्धा त्यांची कृतज्ञतेने आठवण करीत असते. आजचे निंबा गाव एक प्रगती पथावर असलेले गाव असून पंचक्रोशीतील विद्यार्थ्याना शिक्षणाची उत्तम सोय करून देणारे केंद्र आहे. ह्या गावातील प्रगती मालकांच्या अथक प्रयत्नांमुळे झाली .त्यांचे कसे उतराई व्हावे ! हा प्रश्नच आहे. असे चैतन्यस्फुलिंग, श्रीधरराव देशमुख उर्फ ‘मालक’, दि. २ जून १९८५ रोजी अनंतात विलीन झाले. आज त्यांच्या १०२ व्या जयंती दिनी त्यांना त्रिवार वंदन! त्यांच्या जीवनाचा सारांश बा. भ. बोरकर यांच्या या ओळींमध्ये सहज सामावतो:
देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके,
चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे।
देखणा देहान्त तो, जो सागरी सुर्यास्तसा,
अग्निचा पेरून जातो, रात्रगर्भी वारसा।
Post Views: 133