कायद्यांच्या दुरूपयोगाने लोकशाही आणि समाजस्वास्थ संकटात! : संजय एम. देशमुख


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  18 Jul 2022, 8:39 PM
   

 मतलबांसाठी माणूस जेव्हा अति चतूर होतो,तेव्हाच प्रामाणिकतेला तो फितूर होतो . संतसाहित्य स्वत:ला आणि समाजाला प्रेरणा देऊन तारू शकते म्हणतात.परंतू त्यांचे आचरण करून त्यांच्या धर्मवचनातील नैतिकता अंगी बानवून त्याची सुरूवात स्वत:पासून झाली पाहिजे.तरच तो निरोगी समाजव्यवस्था निर्माण करणारा मानवी जीवनमुल्ल्यांचा  आनंददायी मानवताधर्म ठरेल.तोच धर्म मानवजातीचा निश्चितच उध्दार करून शकेल.नाहीतर नुसताच महापुरूष आणि संतांच्या नावाचे वर हात करून करून उद्घोष करायचे.देहूत तुकोबांचे अभंग म्हणायचे,आळंदीत ज्ञानेश्वरांच्या ओव्या आणि पसायदान म्हणायचे,आणि शेवटी जे करायचे तेच करत रहायचे.यातून टाळ्यांच्या कडकडाटात स्वतःच्या अहंकाराला नवा फुलोरा घेऊन त्यांचेच वटवृक्षात रूपांतर करीत राहणे.ह्या दुकानदाऱ्या म्हणजे आमचे मित्र कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांच्या वऱ्हाडी टोल्यांच्या भाषेत रेनकोट घालून अंघोळ करण्याचा ढोंगीपणा ठरू शकतो.
                      संत,महापुरूष,आणि संविधानकार बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन लोकशाहीतील संविधान आणि कायद्यांच्या अधिपत्याखालील या स्वतंत्र भारतात कायद्याचा वापर हा खेळण्यासारखा केला जात आहे.संविधान या सामाजिक विकासाच्या त्या लोककल्याणकारी ग्रंथाने दिलेले कायदे आणि घालून दिलेले मार्गदर्शक नियम हे पालन करण्यासाठी नव्हे तर त्याचा दुरूपयोग करून स्वत:च्या  अघोरी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठीच दिले आहेत.असाच समज येथील अलिबाबा  आणि त्यांच्या चेल्यांचा तथा त्यापासून कुबोध घेणाऱ्या समाजातील अपप्रवृत्तींचा आज झालेला असावा.एवढ्या प्रचंड प्रमाणात  या कायद्यांचे  बाजारीकरण अशा या नरोत्तमांनी करून टाकलेले आहे. कायदे म्हणजे आम्हाला पाहिजे ते फायद्याच्या चौकटीत बसवून जबरदस्तीने मिळवता येणारे शस्त्र असे त्या संविधानाचे विडंबन सुरू आहे.नव्हे तसं करण्याचा विडाच  सदाचाराचे ढोंग घेऊन सर्रास अनाचार करणाऱ्या या देशातील टोळ्यांनी उचललेला आहे.
                 सध्या महाराष्ट्रातील सत्तांतराचा उन्मादी चित्रटपटही लोकशाहीचे धिंडवडे काढणारा आणि संविधानालाही भूकंपाप्रमाणे हादरे देणारा एक विनाशी पायंडा ठरत आहे. या प्रजासत्ताक देशातील अभिनव संस्कृतीच्या महाराष्ट्राची बेअब्रू करणारी ही घटना आहे.बंडखोऱ्या आणि सत्तांतरं यापूर्वीही झाली. परंतू ती संविधानाची एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतारणा करून लोकशाहीची विटंबना करणारी नव्हती.मतलबाला बाधा पोहचली म्हणून लव्ह इन रिलेशनशीपमधील खवळलेल्या खलनायिकांप्रमाणेच घडलेला हा खालच्या पातळीवरील घटनाक्रम म्हणावा लागेल.कारण कधीही सत्तेत न आलेल्या ठाकरे घराण्यातील व्यक्तीने मुख्यमंत्रीही होऊ नये आणि कोणते पदही घेऊ नये.सर्व लूटून आम्हालाच द्यावे.अशा अघोरी महत्वाकांक्षेची ठीणगी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याबरोबर तर पडलीच. परंतू त्यापूर्वीच अजित पवारांनी तोंडघशी पाडल्यामुळे भाजप सरकारचा मधुचंद्र अपूर्ण राहिला त्याचवेळी ती सुप्तवस्थेत होती. मग दोन्हींचे घर्षण झाले.अधिक भडकलेली ती ठीणगी मग घरभेदींच्या हातूनच अधिक भडकवण्यात आली.शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या गनिमी काव्याने त्यानंतरच तब्बल अडिच वर्षानंतरच्या ताकदीने महाराष्ट्रातील सध्याचा राजकीय भूकंप घडून आला. असेच अनैतिकतेचे लोन समाजातही पसरत असून आज बोकाळलेल्या सामाजिक परिस्थितीला अशा हिन मनोवृत्तीच्या राज्यकर्त्यांचे विकृत अनादर्शही बहूतांश प्रमाणात जबाबदार आहेत. 
             ‌.    परवा  सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक महत्वपूर्ण निर्णय म्हणजे स्वार्थासाठी समाजातील घसरलेल्या मनोवृत्तीच्या बोकाळलेल्या परिस्थितीचा अंदाज देणारा तो निकाल होता.एखाद्या स्री आणि पुरूष यांनी एकत्र येऊन स्वत:च्या इच्छेने अनेक वर्ष एकत्र रहायचे.मध्येच कुठे आर्थिक हितसंबंधांना तडा पोहचला आणि अवास्तव अस्तित्वासाठी जोडीदार राजी होत नाही,किंवा  झुकत नाही म्हणून त्याला अद्दल घडविण्याचा निर्णय घ्यायचा.त्यासाठी कायद्याच्या शस्त्रांचा वापर करून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा. ही गोष्ट मानवतावादी समाजव्यवस्थेच्या कोणत्या तत्वात बसते?
अशा घटनेत राजस्थान हायकोर्टाने त्यातील पुरूष आरोपीचा अटकपूर्व जामिनही नाकारला होता.परंतू सर्वोच्च न्यायालयात न्या हेमंत गुप्ता आणि न्या.विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने तो निर्णय बाजूला ठेवला.त्यामध्ये त्यांनी एखाद्या पुरूषाबरोबर महिलेचे स्वेच्छेने एकत्र राहतांना बिनसल्यास अशा प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही. असा सर्व निरिक्षणासाठी  एक महत्वपूर्ण निकाल दिला.
                 दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर आरोपींना कायद्यातील त्रूटींचे गैरफायदे घेता येऊ नये  व त्यांना कठोर शासन व्हावे. महिला अत्त्याचारांना पायबंद घालता यावेत. यासाठी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या.शिक्षणक्षेत्रातील विद्यार्थीनी, शासकीय,प्रशासकीय कामकाज व खाजगी क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या महिला विनयभंग आणि लैंगिक अत्याचारांच्या बळी ठरू नयेत.त्यांना सुरक्षित जीवन प्रदान व्हावे म्हणून कायद्यांमध्ये सुधारणा झाल्या.परंतू त्या कायद्याच्या दुरुपयोगाची शस्त्रे ही ईतरांना वेठीस धरून पैसा कमावण्याच्या मशिनरी झालेल्या आहेत.त्याचा गैरवापर करून लैंगिक अत्याचारांच्या अनेक बोगस प्रकरणांनी जनस्वास्थाला धक्के पोहचवून न्यायव्यवस्थेलाही वेठीस धरले आहे.
                 लैंगिक अत्त्याचाराची जास्तीत जास्त प्रकरणे ही श्रीमंत कुटूंबात किंवा प्रसिध्दीच्या झोतात असलेल्या आणि गडगंज माया कमविलेल्या राजकारण्यांमध्येच का घडतात याची कारणे आज समाजाला सांगण्याची गरज राहिली नाही.मोठमोठे उद्योगपती,राजकारणी आणि सिलेब्रेटीजसोबत संबंध प्रस्थापित केले जातात.पैसा अधिकार आणि मनमानी स्वातंत्र्य मिळते तोपर्यंत संबंध गोडीगुलाबीचे असतात.परंतू एकदा का हितसंबंध दुखावले, की त्याला कायद्याच्या कचाट्यात अडकवून सुड घेण्याची बुध्दी जागृत होते.मग त्यांचे राजकीय सामाजिक आयुष्य संकटात आणण्याच्या धमक्या देऊन,ब्लॅकमेल करून अधिक काही मिळविण्याचा प्रयत्न केले जातात.कायद्यांचे गैरवापर करून न्यायव्यवस्थेलाही आणि समाजाचेही लक्ष विचलित करून त्यांनाही कामाला लावले जाते.वेठीस धरल्या जाते. असेच काम आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्या गुंडाळून ठेऊन लोकप्रतिनिधी म्हणविणारे या देशातील अनेक राजकीय नेते करतात.याला अपवाद आहेत, परंतू ते मोजकेच.बाकी हा प्रवाह तसा व्यापकच झालेला आहे.मग त्यांचेच अनुकरण करीत समाजातील अपप्रवृत्ती सुध्दा त्यांच्याच पावलावर पाऊले टाकत आपल्या अनैतिक यशाचा राजमार्ग शोधत असतात. म्हणजे रसातळाला जाणाऱ्या या परिस्थितीला आज राज्यव्यवस्थेतील बिघडलेल्या राजकीय मनोवृत्ती कारणीभूत आहेत. 
         देशातील अनेक कायदे,राजकीय कायदे  आणि विशेषत:माहिती अधिकार कायद्याचाही असाच बाजार करून ठेवलेला आहे.शासन,प्रशासनातील दिरंगाई आणि भ्रष्टाचारावर अंकूश ठेवण्यासाठी व पारदर्शकता निर्माण होण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली.परंतू या माध्यमातून ठीकठीकाणी माहितीचे अर्ज फेकत राहून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना धमकावून पैसे उकळण्याचे उद्योग सुरू झालेले आहेत.चोरांवर मोर होण्याचे नवे तंत्र अवगत केले जात आहे. दिरंगाई आणि भ्रष्टाचाराला काबूत आणण्यासाठी दिलेल्या माहिती अधिकाराच्या सहाय्याने अलिबाबांच्या भ्रष्टाचाराच्या गुहेत शिरण्याचा वाममार्ग बाबांच्या या चाळीसी शिष्यांनी शोधून काढलेला आहे. 
                            अशा या अनाचारी पापी वाटचालीतून स्वत:चे ईप्सित साध्य करण्यासाठी कायद्यांचे शस्त्र म्हणून आधार घेण्याच्या गैरव्यवहारांचे पाझर उच्च स्तरावरून समाजात खालच्या पातळीपर्यंत म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत झिरपत आहेत.ही वाटचाल संविधान आणि न्यायव्यवस्थेला तथा निरोगी समाजस्वास्थ्याला हादरे देणारी विनाशी ठरत आहे.यथा राजा तथा प्रजा असे म्हणतात.लोकशाही आणि संविधानाचे जतन करण्याची जबाबदारी आणि अंमलबजावणीच ज्या विश्वस्त संस्थेवर संविधान आणि लोकशाहीने मोठ्या विश्वासाने सोपविलेली आहे.ते संरक्षकच जर सर्व स्वायत्त संस्था,तपासयंत्रणा,आणि न्यायव्यवस्थेलाही वेठीस धरण्यात अग्रेसर असतील.तर समाजात नैतिक व्यवस्थेचा दरारा टिकून राहू शकेल का हा एक चिंतनिय प्रश्न आहे.
                  आज काहीही करून घेता येऊ शकते या दृढ समजूतीने समाजातील अपप्रवृत्तीचे मनोबलही चौपट वाढलेले आहे.त्यामुळे एका सुपरपावरचे आम्ही चेले आहोत. आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, या उमद्या आत्मविश्वासाने रहदारीचे नियम तोडून रस्त्यावरून फिरणाऱ्या साध्या हिरो मवाल्यांचेही आणि सडकछाप मजनूंचेही प्रमाण आता  भुईछत्र्यांप्रमाणे वाढलेले आहे.लोकशाही आणि संविधानाचे आदर्शच ज्या देशात अनादर्श ठरविले जात  असतील तेथील वाटचाल ही काट्यावरून चालण्याचा वेदनाग्रस्त खडतर प्रवासच ठरणार आहे.अशा वातावरणात राष्ट्रांच्या आधारस्तंभांना बळकट करण्याच्या कसरतीत त्या देशाला किती ताकद खर्च करावी लागत असेल याचा विचार झाला पाहिजे.त्या चिंतनासाठी याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून लोकशाही आणि नीतिमत्ता,आणि मानवी जीवनमुल्यांच्या संस्कृतीचे पोकळ अभिमान बाळगणाऱ्या सुपरपावर भारताकडेच पहावे लागेल. देशातील युवाशक्तीला अनेक आमिषं दाखवून संमोहिनाव्दारे धर्म आणि जातीचे जहाल डोस देऊन अनिष्ट वळणे लावली जात आहेत. समाजजीवन संकटग्रस्त करणाऱ्या या धोकादायक प्रवाहाची गती वेळीच ओळखून जनतेने याबाबत दक्ष राहिले पाहिजे.नाही तर या गुन्हेगारांना तारणाऱ्या आणि सर्वसामान्न्यांना मारणाऱ्या लाटांचा प्रवाह समाजातील अनेकांची घरे उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही.
संजय एम. देशमुख, संपादक 
मोबा.क्र.९८८१३०४५४६ 

    Post Views:  373


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व