कव्वाल्यांच्या माध्यमातून जातीय सलोखा साधण्याचा सांस्कृतिक संचालनालयाचा उपक्रम अभिनंदनीय - प्रा. मधु जाधव
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2025-02-08
सीमा सबा यांच्या बहारदार कवाल्यांनी महोत्सवाचा समारोप
अकोला : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालयाने आयोजित केलेल्या कव्वाली महोत्सवाने जातीय सलोखा जपण्याचा मोठा संदेश दिला आहे. त्यामुळे या विभागाने समाजास प्रबोधन देणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनावर भर द्यावा. असे मनोगत ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. मधु जाधव यांनी व्यक्त केले. शासनाच्या वतीने स्थानिक प्रमिलाताई ओक हॉलमध्ये आयोजित दोन दिवसीय कव्वाली महोत्सवाचा समारोप संपन्न झाला. या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशिष शेलार, या विभागाचे सचिव विकास खारगे (भा. प्र. से. ), संचालक विभीषण चवरे यांच्या संकल्पनेतून हा कव्वाली महोत्सव आयोजित करण्यात आला होता. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात प्रख्यात कव्वाल राहुल शिंदे, करिष्मा ताज, भीमेश भारती, सीमा सबा यांनी मंदिर, मस्जिद, संविधान, देशप्रेम, जातीय सलोखा आदि विषयांवर कव्वाल्या सादर करून सर्व श्रोत्यांना एकता व अखंडतेचा संदेश दिला.
या महोत्सवात प्रामुख्याने उपस्थित असलेले अ. भा. लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप खाडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या महोत्सवात मनोरंजनाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील लोकांना हम सब भाई भाई हा संदेश दिला आहे.
जनयात्रा दैनिकाचे संपादक तथा ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम आवारे आपल्या मनोगतात म्हणाली की, या कव्वाली महोत्सवातून राष्ट्रीय एकात्मता आणि धार्मिक ऐक्याचा मजबूत सेतू बांधण्याचे मोठे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दिशेने जाण्याची सुरुवात केली आहे. सांस्कृतिक व कला संचालनालयाने एकाच वेळी अनेक जाती धर्मीयांची मने उन्नत राष्ट्रीय प्रवाहाच्या दिशेने वळविण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्येष्ठ साहित्यिक, कवी व हास्य जत्रा फेम किशोर बळी आपल्या मनोगतात म्हणाले की, समाजासाठी पोषक असलेल्या आचार विचारांच्या प्रचारार्थ सांस्कृतिक संचालनालयाने मनोरंजनातून एकात्मता साधण्याचा कव्वाली महोत्सवाच्या माध्यमातून केलेला प्रयत्न अभिनंदनीय आहे. दोन दिवस चाललेल्या या कव्वाली महोत्सवास अकोलेकर रसिकांनी मोठी उपस्थिती दर्शवून भरभरून दाद दिली. या महोत्सवाच्या यशासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधीक्षक वसंतराव खडसे, अकोला कार्यालयाचे समन्वयक सचिन गिरी, सहसमन्वयक महेश इंगळे, अंकुश खोतमारे, प्रथम पिंपळे, गोविंद उमाळे, मंदार घेवारे यांनी परिश्रम घेतले
Post Views: 126