वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा मच्छीमारांनी केला निषेध..


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Sep 2024, 8:43 AM
   

पालघर : एका बाजूला देशाचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या वाढवण बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असतानाच ,दुसरीकडे मात्र स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्रांनी विरोध करत केला निषेध केला आहे.
    आज पालघर येथे वाढवण बंदराचे भूमिपूजना करिता  करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या मंडपामध्ये चिखल आणि पाणी साचल्यामुळे सभेला आलेल्या जनतेला त्याचा सामना करावा लागत होता. याच जनतेने प्रतिनिधींना निवडून दिले आहे त्याच जनतेला आज  दीड ते दोन किलोमीटर चालत जावे लागत होते. त्यामध्ये वयस्कर पुरुष व महिलाही सहभागी झाल्या होत्या. उभारलेल्या मंडपामध्ये मध्ये कुठल्याही प्रकारची चोख व्यवस्था,  नसल्याने जनतेचे अतोनात हाल बघावयास मिळाले. त्याचप्रमाणे सभेला जाताना सुरक्षा रक्षकाने साधी पाण्याची बाटली व खाद्यपदार्थ  घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने, व तिथे केलेल्या पाण्याची सोय नागरिकांस अपूर्ण पडल्यामुळे  बरेचसे नागरिक पाण्याने व भुकेने व्याकुळ झाले होते. सभेकरिता केलेला करोडचा खर्च नक्की  गेला कुठे? याचा शोध घेऊन बोध घेणे महत्त्वाचे ठरेल.
 एका बाजूला वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र विरोधी संघटना आणि महाविकास आघाडी आक्रमक झाली होती .पालघरच्या वरोर - वाढवण येथे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीसह २० पेक्षा अधिक संघटनांनी एकत्र येऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ,केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जेएनपीएची अंत्ययात्रा काढली . 
   पंधरा हजारांपेक्षा जास्त पोलीस फौज फाटा घेऊन मोदी आले होते ते भूमिपूजन करून निघून जातील पण बंदराचं काम त्यांना वाढवण भागात करायच आहे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी दिला.
त्याचबरोबर डहाणू आणि परिसरामध्ये वाढवण बंदराच्या विरोधात नागरिक आक्रमक झालेले असून त्यांनी समुद्रामध्ये आपल्या बोटींना काळे फुगे आणि झेंडे लावून आंदोलनाला सुरुवात केली होती. तसेच धाकटी डहाणू गावातील मच्छीमार बांधवांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजनाविरोधात निषेधार्थ काळे झेंडे, काळे फुगे बोटीवर लावून रॅली काढली.
वाढवण बंदरामुळं मच्छीमार समाज उध्वस्त होऊन वडिलोपार्जित व्यवसायाला मूकणार आहेत . पालघरमध्ये वाढवण येथे जे बंदर होणार आहे तो मच्छीमारांसाठी गोल्डन बेट आहे. प्रत्यक्ष ते अप्रत्यक्षपणे लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्याचबरोबर 1996 पासून वाढवण बंदराचा घाट शासनाकडून घातला जात आहे.  भूमिपुजनाचा कार्यक्रम होत असताना त्याचा आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करत आहोत, असं मच्छीमारांनी म्हटले.

    Post Views:  93


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख