टॉवर कंपन्यांची मनमानी ; शुल्क वाढीचा तिढा सुटेना!
महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरात 201 टॉवर उभे टॉवर कंपन्यांकडे ९५ लाखांचे परवानगी शुल्क थकीत
अकोला - महापालिका क्षेत्रातील २०१ मोबाईल टॉवर कंपन्यांकडे ९५ लाखांचे परवानगी शुल्क थकीत असून विना परवाना मोबाईल टॉवर सुरू आहेत. यामधील काही टॉवर बंद असल्याचा दावा कंपन्यांकडून केला जात आहे. हे कमी म्हणून की काय टॉवर कंपन्या महापालिकेचे शुल्क भरण्यास तयार नसून या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
मनपा प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार महापालिका क्षेत्रात मोबाईल टॉवर कंपन्यांचे १९१ टॉवर असून बीएसएनएल कंपनीचे २० टॉवर उभे आहेत. या टॉवर कंपन्यांकडे ९५ लाखांचे परवानगी शुल्क प्रलंबित आहे. नवीन दरानुसार शुल्क आकारणी करा अशी त्यांची मागणी आहे. याशिवाय आम्ही शुल्क भरणार नाही असा रेटा लावून कंपन्या मनपा प्रशासनासोबत न्यायालयात भांडत आहेत मात्र, नवीन दरानुसारही पूर्वी इतकेच शुल्क या कंपन्यांकडे निघत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या कंपन्यांनी 61 टॉवरचे शुल्क मनपाकडे अदा केले असून अद्यापही कंपन्या ११५ टॉवर संदर्भात रिवाईज रेट वर अडून बसल्या आहेत. सन २०२२ च्या शासनाच्या नवीन दरानुसार शुल्क आकारावे असा युक्तिवाद या कंपन्यांनी न्यायालयात केला असून या दरानुसार पूर्वी आकारलेल्या शुल्का इतकीच रक्कम होत असल्याचा युक्तिवाद मनपाच्या वतीने विधिज्ञांनी केला आहे.
दरम्यान नगररचना विभागाने या कंपन्यांना परवानगी शुल्क भरण्यासाठी डिमांड नोट बजावली होती. त्यापैकी रिलायन्स जिओने 3 कोटी मनपाला अदा केले होते. मात्र, इंडस, एटीसी या मोबाईल टॉवर कंपन्यांनी डिमांड नोट जारी करूनही परवानगी शुल्क भरले नाही. प्रशासनाने आकारलेले शुल्क या कंपन्यांना मान्य नव्हते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या दोन्ही कंपन्यांनी काही शुल्क भरले परंतु उर्वरित परवानगी शुल्क भरायला ते तयार नसल्याचे समजते. रिलायन्स जिओने यापूर्वीच 3 कोटींचे परवानगी शुल्क महापालिकेकडे अदा केले आहे. महापालिकेने शुल्क आकारणी नियमानुसार केली नसल्याचे कारण पुढे करून इंडस व एटीसी या दोन कंपन्या न्यायालयात गेल्या आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात २०१ मोबाईल टॉवर उभे आहेत. पण यामधील काही टॉवर बंद असल्याचा दावा कंपन्यांकडून केला जात आहे. एवढया मोट्या रकमेची थकबाकी असल्यामुळे मनपा चे आर्थिक नुकसान होत आहे.
Post Views: 127