भक्ती मार्गातील एका कृतिशील साधकांच्या जीवनगाथेचा अंत..!
निंबा वारकरी सांप्रदायातील केशवराव विठ्ठलराव देशमुखांचे निधन... भावपूर्ण श्रध्दांजली..!
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2024-05-17
मानवी समाजात येणारा मनुष्यप्राणी जन्माला येतो,आयुष्यभर पारिवारीक कर्तव्यांना पूर्ण करीत आपल्या कर्मप्रधान जीवनाची ओळख एवढीच कर्मगीता मागे कायम ठेवत या जगाचा निरोप घेत असतो. मनुष्य जन्म मिळाला याची जाणीव असतांनाच, लहान,मोठ्या सर्वांची काळजी ठेवत पारिवारीक जबाबदाऱ्या पार पाडत , त्यातूनच स्वतःसाठी पण फावला वेळ काढत तो आयुष्य जगत असतो.मृत्यू केव्हा येणार आणि घरादाराच्या निरोप घेत अखेर शेवटच्या प्रवासाला केव्हा निघून जावं लागणार याची पूर्वकल्पना कधीच कोणाला आलेली नाही...येणारी ही नसते. यातील बरेच जण कुटुंबातील पूर्वापार संस्कार आणि वैचारीक वारसा स्विकारत लहानाचं मोठं होतं आपल्या जीवनाला आकारदेत असतात. एक जबाबदार कुटूंप्रमुख आणि समाजातील नागरीक म्हणून आपल्या कर्तव्याने सिध्द होत असतात. प्रसिध्दी पलिकडे साधं जीवन व्यतित करणाऱ्या अशा बऱ्याच व्यक्ती समाजात असतात.त्यापैकीच एक म्हणजे स्व.केशवराव देशमुख,निंबेकर !
याच सत्याच्या उपरतीने घराण्यातील आध्यात्मिक संस्कारांकडे आकर्षित होऊन,भक्तिमार्गाने एक आनंदी जीवन जगत भौतिक जीवनात वारकरी सांप्रदायाची पताका आयुष्यभर कर्तव्यपूर्वक जबाबदारीने सांभाळणारे, एक सत्शिल,सज्जन,सदाचारी गृहस्थ म्हणजे स्व.केशवराव विठ्ठलराव देशमुख होते. आयुष्यभर कष्ट करीत सरळमार्गी जीवन व्यतित करणारे निंब्याच्या देशमुख घराण्यातील एक सद्गृहस्थ, साधू घराण्यातील प्रामाणिक सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे माळकरी बंधू स्व.केशवराव भाऊ...!
ज्या माणसाने आपल्या घराण्याचा वैचारीक वारसा,सेवा धर्माची परंपरा आयुष्यभर चालवली. ऐन तारूण्यात कष्ट करीत, नेटका संसार करीत सर्व भावंडांना विकासाच्या मार्गावर लावले.परिवाराच्या सर्वच जबाबदाऱ्या खांद्यावर घेत समाजातील सुख,दु:खाच्या प्रसंगांमध्ये सुध्दा सहकार्याचा हात दिला. परिस्थितीच्या रडगाण्यांना जिथल्या तिथे विसरून त्यागी वृत्तीने समाधानी जीवन जगणाऱ्या समाजातील अशा व्यक्तिमत्वांना "कर्मयोगी" म्हटलं जातं. त्यांनी मोठेपणा,प्रसिध्दीचे सारे हव्यास बाजुला ठेऊन निर अहंकारी मर्यादित जीवन स्विकारलेलं असतं.असं इतरांच्या नजरेत येणारं आगळ्या वेगळ्या प्रकारचं समाधानी आयुष्य जगण्याचं भाग्य फक्त सत्संगाच्या भक्ती मार्गातून आणि मानवी जीवनातील कर्तव्याच्या धगधगत्या अनुभवांमधून ताऊन सुलाखून निघालेल्या लोकांच्याच वाट्याला येत असते. असे भाग्यशाली आयुष्य जगलेले आणि त्यानेच किर्ती रूपे लोकांच्या मनात ठासलेलं एक सरळ,साधं,सन्मार्गी व्यक्तिमत्व म्हणजे बाळापूर तालूक्याच्या निंबा गावातील आमचे माळकरी बंधू स्व.केशवरावभाऊ देशमुख होते..!
आंघोळ,पुजेचा नित्यक्रम पार पाडत हातात पाण्याचा लोटा घेऊन प्रथम मंदिरात जाऊन येणारे स्व.केशवरावजी अनेक वर्षांपासून निंबा गावातील लोक दररोज सकाळी पाहत होते.परंतू सोमवार दि.१३ में २०२४ ची पुजा करून ते बसले.त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अकोला येथे ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला नेण्याचा तातडीचा सल्ला. डॉ.अमित वसंतराव देशमुख यांनी दिला.त्यावेळी हातात लोटा घेऊन आज सकाळी मंदिरात गेलेले स्व.केशवरावजी उद्यापासून दिसणारच नाहीत असं कुणालाच वाटलं नसेल.परंतू घडलं मात्र तसंच..... हृदयविकाराच्या येऊन गेलेल्या तिव्र झटक्यामुळे पुढील उपचारांना त्यांनी प्रतिसादच दिला नाही.कारण तो नियतीचा तातडीने निघून येण्याचा आदेश असावा....!
त्यामुळे अनेक वर्षाच्या माळेतील धागा कमजोर झाल्याने त्यातील एक मणी तुटून केव्हा बाजूला गेला हे कुणाला समजलंच नाही. तो नंतर सापडणार सुध्दा नाही अशी कल्पनाही कुणी करू शकले नाही.मात्र तसे घडले...आणि परिवारासोबतच्या ऋणानुबंधाच्या मायावी भावनिक बंधनांची ईतिश्री त्यांनी संपविली.त्या जीवन ग्रंथातील शेवटच्या अध्यायाला त्यांच्या मृत्यूने सोमवार दि.१३ में २०२४ रोजी पूर्णविराम दिला. मंगळवार दि.१४ में रोजी सकाळी १०.४० ला अग्निसंस्कारांच्या साक्षीने अनंताच्या प्रवासार्थ वैकुंठाच्या राजपथावर नेऊन सोडले. परिवार,गावकरी आणि आप्तस्वस्कियांसोबतच निंबा गाव आणि परिसर त्यांच्या जाण्याने हळहळला. जो आवडतो सर्वांना....तोची आवडे देवाला या सत्त्याची प्रचिती तापत्या उन्हात निंबा येथे त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती देणाऱ्या प्रचंड गर्दीतून आलेली होती.
येथील वारकरी संप्रदायाच्या भक्तिमार्गात सर्व कर्तव्य पार पाडीत घेतलेल्या गुरूमंत्राचे तंतोतंत पालन करण्यात त्यांनी कधी कसर सोडली नाही. मुर्ती उंचीने लहान,शरीराने ही किरकोळ पण संतसहवासाच्या सन्मार्गात मात्र महान ठरली. कठीण काळात उत्तम शेतीला सोपान करीत त्या प्रयत्न आणि कष्टाचा वारसा त्यांनी आपल्या भावंडांना दिला. त्यांच्यासह स्व.अरूणराव आणि आता ज्ञानेश्वरराव व गोविंद,निवृत्ती अशी ही पाच भावंडं..! दुधदुभत्यांसोबत ईतर शेतीसोबत जोडधंद्यांचे कसब त्यांनी सर्वांच्या गळी उतरविले. स्वत:चा मुलगा अनंत देशमुख शेतीसोबतच कृषी सेवा केन्द्राने परिसरातील कास्तकारांच्या संपर्क सेवेत राहिला.तर छोटे बंधू स्व.अरूणराव यांचे चिरंजीव गणेश देशमुख हे ग्रामपंचायतीतून सामाजिक क्षेत्रातील विकास कार्यात अग्रेसर नेतृत्व ठरत आहेत.
आपल्या विकास आणि सेवारथाची ही दोन चाके टणक करुन त्यांना गती देण्याच्या कामात स्व.केशवराव भाऊंची वाटचाल अथक परिश्रमाने मोलाची ठरली. त्यामध्ये त्यांना श्रीमती वंदना वहिनी,सर्व बंधूराज,दिराणी मंडळ,आणि कुटूंबियांची भरभक्कम साथ मिळत गेली. आज त्यांची यशस्वी मुले,उच्चशिक्षित नातवंडं,जावाई असं त्यांच्या जीवन प्रवासातील हे सर्वमान्य सत्त्य ते आज मागे ठेऊन वैकूंठ प्रवासाला निघून गेलेले आहेत. हा सारा एका साधारण शेतकरी,श्रमकरी आणि सरळमार्गी सत्शिल माणसाने प्रामाणिकतून घडविलेला हा ईतिहास आहे.याला अनुचित मार्गाची किनार कुठेच नव्हती.दान, धर्म, परोपकार, तिर्थयात्रा, पर्यटनात अग्रेसर अग्रेसर आप्तस्वकियांप्रतीची कर्तव्ये पार पाडण्याच्या मोठ्या प्रमाणात त्यांचा बोलबाला होता.आयुष्यभरातील श्रमप्रतिष्ठेचे घेतलेले कडक अनुभव, प्रपंच, रोजी रोटी,शेती,उद्योग आणि सामाजिक कर्तव्ये पार पाडतांना अनुभवलेली सत्त्ये ते तरूण मुलांना सांगत असत.त्यांनाही त्या अनुभवांच्या प्रेरणांमधून फायदा व्हावा हे त्यांच्या बोलण्यातून अनेक वेळा समोर येत होतं.
जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा प्रवास ही दोन बिंदूंना जोडलेली एक समांतर रेषा असते. त्याचा शुभारंभ हा जन्म या प्रथम बिंदू पासून होतो.या कर्मप्रधान आयुष्यातील एक- एक वर्षाच्या अंतराचे उध्दिष्ट पूर्ण करीत प्रत्येक माणूस हा मुक्कामाच्या अंतिम ठीकाणी जायला निघालेला असतो.परंतू हे कटू सत्य लक्षात न घेता तो जीवनातील अनेक क्षण आनंदी करीत नियतीने दिलेल्या विस्मृती नामक उपहाराच्या मदतीने अधिक उर्जा संपादन करीत चाललेला असतो.असं करीत चालत असतांनाच गाढ झोपेतच त्याचा जीवनातील दुसरा बिंदू समोर येतो.ते ठीकाण कायम मुक्कामाचं असतं....येथे आयुष्यभराचा प्रवास संपलेला असतो..बसवाहकाने बेल मारून त्याची झोप उडवलेली असते.हेच मानवी जीवनातील सर्वसिध्द अंतिम सत्य आहे.
कारण या दिवसापासून तो मनुष्य देहरूपाने कधीच दिसणार नसतो.फक्त त्यांची आयुष्यभरातील कर्मच त्याच्या अस्तित्वाच्या खूणा पटवून देणारं असतं...शरीर गेलेलं असतं...आणि नाव फक्त किर्ती रूपाने उरलेलं असतं.अशी सन्मार्गातील वाटचालीची किर्ती मागे ठेऊन कायमचं काळाच्या पडद्याआड गेलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बंधू स्व.केशवराव विठ्ठलराव देशमुख...! श्री.अनंत देशमुख यांचे वडील व निंबा ग्रामपंचायत सदस्य श्री.गणेश देशमुख यांचे मोठे वडील....!
पत्नी, मुलं, मुली, नातवंडं आणि बऱ्याच मोठ्या आप्तपरिवारातील प्रिय असलेलं हे सरळमार्गी शांत सोज्वळ कुटूंबप्रमुख होते.त्यांना परेमेश्वर चिरकाल शांती देवो
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...स्मृतिला विनम्र अभिवादन...!
संजय माणिकराव देशमुख, (निंबेकर), पत्रकार, मोबा.क्र ९८८१३०४५४६
Post Views: 154