शाळेत पेपर फुटल्यास मान्यता काढणार
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांची घोषणा; भयमुक्त परीक्षा घेण्याचे आवाहन
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
16 Mar 2022, 8:10 PM
मुंबई : राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून, परीक्षा सुरळीत पार पडावी याकरिता शिक्षण मंत्र्यांनी कडक धोरण अवलंबले असून त्याचाच एक भाग म्हणून कोणत्याही शाळेत पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत केली आहे.
नगर जिल्ह्यातील ज्या शाळेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले त्याची मान्यता काढून घेण्यात आली आहे. यापुढे ज्या शाळेत पेपर फुटीचे प्रकरण समोर येईल त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल. तसेच एखाद्या शाळेत कॉपीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांना यापुढे परीक्षा केंद्र दिले जाणार नाहीत, अशा प्रकारची घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केल्याने परीक्षा केंद्रावर विशेष दक्षता घेतली जाणार आहे. यासोबतच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी एक तास अगोदर पोहोचावे. सकाळी 10.30 चा पेपर असल्यास 9.30 वाजता तर दुपारी 3 वाजता पेपर असल्यास 2 ला पोहोचावे. परीक्षेला उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करूनच परीक्षा केंद्रात सोडले जाणार आहे.
परीक्षेसंदर्भात गैरसमजाचे वातावरण पसरू नये दहावीचे विद्यार्थी हे राष्ट्राच्या आणि देशाचे भवितव्य आहेत. त्यांना निर्भीडपणे परीक्षा देण्यासाठी वातावरण निर्माण करावे. शाळा तिथे परीक्षा केंद्र दिल्याने राज्यात या वेळी दहावीच्या परीक्षेला मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्र वाढलेले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त अधिक देण्याची विनंती आम्ही केलेली आहे. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यासाठीची माहिती घेऊन परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे देखील वर्षा गायकवाड सभागृहात म्हणाल्या.
परीक्षेला जाणार्या विद्यार्थ्यांसाठी सूचना...
-परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजर राहणे गरजेचे असेल. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर म्हणजे सकाळच्या सत्रात 10.20 पर्यंत ते दुपारच्या सत्रात 2.50 मिनिटांनी पर्यंत परीक्षा केंद्रात हजर राहणे गरजेचे असेल. विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे उशिरा आल्यास त्याच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याची सर्व तपासणी करून सकाळच्या सत्रात 10.30 पर्यंत तर दुपारच्या सत्रामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत प्रवेश दिला जाईल. परीक्षा सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात सकाळी 10.30 नंतर तर दुपारच्या सत्रात 3 वाजेनंतर कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्याला परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
सहकार्य करण्याचे आवाहन...
15 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र निर्माण केल्यामुळे काही शाळांमध्ये प्रथमच परीक्षा घेतली जात आहे. परीक्षा केंद्रांवर कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत तसेच नियमित अभ्यास करून परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. याअनुषंगाने राज्यात सर्वत्र परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्याबाबत सहकार्य करण्याची विनंती शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड यांनी गृहमंत्र्यांकडे केली होती. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, परीक्षेसंदर्भात गैरसमज पसरू नयेत, यासाठी माध्यमे, लोकप्रतिनिधी, स्थानिक नागारिक, पालक यांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रा. गायकवाड यांनी विधान परिषदेत यासंदर्भात बोलताना केले.
Post Views: 281