शिवसेना ताब्यात घेण्यासाठी खेळी; शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर
मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
18 Jul 2022, 8:43 PM
मुंबई ः उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या घटनापीठासमोर 20 जुलै रोजी होणार आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना ताब्यात घेण्याची मोठी खेळी खेळण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांची आज बैठक झाली. यानंतर शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे.
या कार्यकारिणीत पक्षप्रमुख पदाचा कुठेच उल्लेख नसून, इतर पदांची आणि त्यावर नियुक्त नेत्यांची नावे शिंदे गटाच्या वतीने जारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेतील अनेक नेत्यांवर कारवाई केली जात असतानाच शिंदे गटाकडून आता ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करत नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे, तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही. एकनाथ शिंदे गटाने घेतलेला हा निर्णय म्हणजे मूळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटाने शिवसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करताना नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. या दोघांचीही शिवसेनेतून पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणाखाली हकालपट्टी करण्यात आली होती. शिंदे गटाने उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदारांची बैठक सोमवारी ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडली. या आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या काही खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली होती. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे 14 खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू होती. खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे गट अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यासाठी आता खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे. त्यासाठी शिंदे गटात सामील होत असल्याचे जाहीर करताना अनेक जण शक्तिप्रदर्शन करत आहेत.
खासदारांमध्येही फूट पडण्याची शक्यता
शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवरची फूट उद्या, 19 जुलैला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांची नेमणूक केली जाणार असून, प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना मंगळवारी दिले जाणार आहेे. लोकसभेत बारा खासदारांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार तूर्तास मातोश्रीशी एकनिष्ठ असल्याचे दिसत आहे.
रामदास कदम, आनंदराव अडसूळ यांची हकालपट्टी
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीका करून रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला होता. आता शिवसेनेने रामदास कदमांसह आनंदराव अडसुळांची पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे हकालपट्टी केली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी माझी नेतेपदी निवड केली. परंतु, त्यांच्या पश्चात नेतेपदाला काही अर्थ राहिला नाही. माझ्यावर आरोप केले गेले, परंतु मला माझी बाजू मांडण्यासाठी मीडियासमोर येण्यास मज्जाव करण्यात आला होता, असा आरोप रामदास कदमांनी पत्रातून केला होता.
शिंदेंकडून नवी कार्यकारिणी जाहीर
मुख्य नेता- एकनाथ शिंदे
मुख्य प्रवक्ते- दीपक केसरकर
उपनेते- तानाजी सावंत
उपनेते- यशवंत जाधव
उपनेते- गुलाबराव पाटील
उपनेते- उदय सामंत
नेतेपदी - रामदास कदम, आनंदराव अडसूळ
Post Views: 211