श्री शिवाजी महाविद्यालयात जलसाक्षरतेबाबत कार्यशाळा


समाजात जलसाक्षरता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे; वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड
 विश्वप्रभात  06 Mar 2024, 9:07 PM
   

अकोला : पावसाचा प्रत्येक थेंब साठवून ठेवणे ही काळाची गरज आहे. भूगर्भशास्त्राचे विद्यार्थी, अभ्यासक व संशोधकांनी पाणी बचतीच्या चळवळीत, जलसाक्षरता वाढविण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड यांनी आज येथे केले.

भूजल सर्वेक्षण विभागातर्फे श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित जलसाक्षरता कार्यशाळेत ते बोलत होते. प्राचार्य ए. एल. कुलट, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, डॉ. प्रवीण बरडे, डॉ. आशिष राऊत, डॉ. संजय शेंडे, डॉ. जी. डी. गायकवाड, डॉ. एस. एस. देशमुख, पी. एम. गिरी, डॉ. टी. आर. पाटील, भूवैज्ञानिक इंद्रजीत दाबेराव आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. कराड म्हणाले की, पाऊस पडला की केवळ 10 टक्के पाणी जमीनीत मुरते. त्यातूनच पेयजल, शेती सिंचन, उद्योग वापर अशा गरजा भागवल्या जातात. या गरजा आणि उपलब्ध स्त्रोत यांचा ताळमेळ साधण्यासाठी  भूजल पुनर्भरण आत्यंतिक गरजेचे असते अन्यथा टंचाईला सामोरे जावे लागते. पाण्याचे दुर्भिक्ष्य टाळण्यासाठी पावसाच्या पाण्याची साठवणूक आणि पाण्याचा कार्यक्षम वापर आवश्यक आहे. त्यादृष्टीने समाजात जलसाक्षरता वाढली पाहिजे. या कार्यात भूविज्ञान शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यशाळेतून भूजल संवर्धनाशी निगडित विविध बाबी उलगडण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी ही माहिती आत्मसात करून जलसंवर्धनाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. कुलट यांनी केले.

श्री. पवार व इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. भूजल संवर्धनाचे महत्व सांगणारा एक लघुपटही यावेळी दाखविण्यात आला. कार्यशाळेला भूविज्ञान शास्त्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Post Views:  202


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व