श्रीगोंद्यात मनसे उमेदवार संजय शेळके यांची पत्रकार परिषद
श्रीगोंदा --आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि अपक्ष उमेदवारांमध्ये रंगतदार लढत अपेक्षित असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उमेदवार संजय शेळके यांनी आपली भूमिका स्पष्ट करून राजकीय संघर्षात आपले आव्हान उभे केले आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय शेळके यांनी आपल्या उमेदवारीची औपचारिक घोषणा करताना, तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न मांडले. त्यांनी विद्यमान आमदारांच्या विकासकामांवर टीका करत सांगितले की, “तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न वाढत आहे आणि लवकरच दुष्काळ, लाईटच्या समस्यांमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट येणार आहे. कृषी महाविद्यालय मागे गेले आणि जिल्हा उपरुग्णालय सुरू करण्यात दिरंगाई होत आहे.”
शेळके यांनी मनसेच्या कार्यशैलीत अनेक आंदोलने केली असल्याचे नमूद केले. “छावणी, विद्यार्थ्यांच्या समस्या, एसटी प्रवासाच्या समस्या आणि पाण्यासाठीची आंदोलने यांच मी नेतृत्व केल आहे. अश्याच आंदोलनांमुळे ५६ कोटींची पाणी योजना माझ्या गटात राबवली आहे,” असे शेळके यांनी सांगितले. याशिवाय, साकळाई पाणी सिंचन योजना हा तालुक्यातील राजकारणाचा मोठा मुद्दा असल्याचे ते म्हणाले.
मनसेच्या उमेदवार म्हणून अर्ज दिनांक २५ ऑक्टोबरला दाखल केला जाईल असे शेळके यांनी जाहीर केले. त्यांच्या प्रचारासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेचा प्रयत्न सुरू असल्याचे मनसे पदाधिकारी अतुल कोठारे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेसाठी संजय शेळके यांच्यासोबत अतुल कोठारे, वैभव हराळ, गणेश शिंदे, महेश थिटे आणि भालचंद्र आनंदकर हे मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 289