महाविद्यालयातील छळवादा विरूध्द प्रा डॉक्टर रेखा आढाव यांचे २६ पासून आत्मक्लेश अन्नत्याग उपोषण
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
25 Jan 2024, 8:56 AM
अकोला : अकोला येथील श्री धाबेकर कला महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रेखा आढाव यांची फेब्रुवारी २०२२ पासून महाविद्यालयीन विकास समिती द्वारे छळवाद व सेवा विषयक बाबींच्या नुकसानाविरूध्द संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ अमरावती यांचे तक्रार निवारण समिती समोर दाखल केलेली तक्रार प्रलंबित आहे. विद्यापीठ कायद्यानुसार समिती समोर दाखल तक्रार 30 दिवसांच्या कालावधीत निकाली लागणे बंधनकारक असते. मात्र प्राध्यापक डॉ. रेखा आढाव यांची तक्रार समिती समोर दाखल होऊन दोन वर्षाचा कालावधी होत आलेला आहे. मात्र अजूनही त्यांची तक्रार समितीने सुनावनीला घेतलेली नाही. त्यामुळे समिती स्त्री प्राध्यापकांचे प्रश्नाबाबत संवेदनशील आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो आहे
आपल्या तक्रारीची सुनावणी तातडीने व्हावी यासाठी प्राध्यापक रेखा अढाव यांनी विद्यापीठाचे विधी विभागाचे सचिव/समितीकडे वारंवार विनंती पत्र व्यवहार केलेला आहे. मात्र विधी विभागाचे सचिवाद्वारे वारंवार आश्वासन देऊनही प्राध्यापक रेखा आढाव यांच्या तक्रारीची नियमित सुनावणी समितीने आज पर्यंत लावलेली नाही.
विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अजूनही लोकपालाची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे विद्यापीठांतर्गत न्यायालयीन व्यवस्था असलेल्या तक्रार निवारण समितीच्या पारदर्शक कारभाराविषयी प्रश्न निर्माण होतो आहे. नियमित न्यायव्यवस्थेसमोर प्रश्न निकाली लागायला वेळ जातो म्हणून विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठांतर्गत सेवाविषयक बाबींचे निर्णय होण्याकरीता विद्यापीठ तक्रार निवारण समितीची रचना करण्यात आलेली आहे. मात्र कुठल्याही कारणाशिवाय विद्यापीठ तक्रार समितीने प्राध्यापक डॉक्टर रेखा आढाव यांची तक्रार सुनावणीला न घेता प्रलंबित ठेवलेली आहे. त्यामुळे व्यथित होऊन डॉक्टर रेखा आढाव यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे व्यवस्थेविषयी क्षोभ व्यक्त केला आहे.त्यामुळे दि.२६ जानेवारी पासून विद्यापीठाचे विधी विभागापुढे आत्मक्लेष अन्नत्याग उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. विद्यापीठ प्रशासन व विधी विभागाणे या प्रकरणी न्याय द्यावा याकरीताच हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे अशी माहिती समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविली आहे.
Post Views: 80