जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
17 Aug 2023, 9:51 AM
अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दिमाखात फडकणारा राष्ट्रध्वज, देशासाठी योगदान देणा-या स्वातंत्र्यसैनिक, सैनिकांच्या कुटुंबियांची उपस्थिती, राष्ट्रगीताचे आसमंतात निनादणारे सूर अशा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता अढाऊ, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर, अनिता भालेराव, उपवनसंरक्षक कुमारस्वामी यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक व शहिद सैनिकांचे कुटुंबिय, अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरुवातीला जिल्हाधिका-यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगीताची धून वाजवून राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत सादर करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिका-यांनी स्वातंत्र्यसैनिक, शहिद सैनिक यांच्या कुटुंबियांना व विविध मान्यवर, अधिका-यांना भेटून संवाद साधला व सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सांगतेनिमित्त मेरी माटी, मेरा देश ही मोहिम सर्वदूर राबविण्यात येत असून, पंचप्रण शपथ, स्वातंत्र्यसैनिक आणि शूरवीरांचा सन्मान म्हणून गावोगाव शिलाफलक, अमृतवाटिका आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गावोगाव स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालये, पंचायत समित्या, नगरपरिषदांच्या इमारतींवर रोषणाई करण्यात आली. स्वातंत्र्यदिन सोहळ्यात दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नी, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, तसेच विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Post Views: 90