चांद्रयान-३ : भारताच्या वैज्ञानिक प्रगतीची नेत्रदिपक यशस्वी मोहिम..!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  24 Aug 2023, 1:23 PM
   

           अथक परिश्रमानंतर एखादी महत्वाची मोहिम यशस्वी झाल्यानंतर त्याचा आनंद किती अवर्णनीय असतो याचे सुखद अनुभव याची डोळा यांची देही करोडो भारतियांना अनुभवायला मिळाले.चांद्रयान- ३ ची मोहिम यशस्वी झाली आणि ईस्त्रो च्या शास्त्रज्ञांसह संपूर्ण भारतियांनी एक अनोखा आनंद काल व्यक्त केला.स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील हा एक अनमोल क्षण होता.भारताला वैज्ञानिक प्रगतीमधील महानता आणि प्रतिष्ठा मिळवून देणारी  जागतिक किर्तीची ही आनंददायक मोहिम होती.यामुळे अमेरिका, सोव्हिएत महासंघ आणि चीन नंतर चंद्रावर यशस्वीपणे आपले यान उतरविणारा भारत हा चौथा देश ठरला आहे.
      सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी या यानाने चंद्राच्या पृष्ठभागावर स्पर्श केला.मात्र दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा प्रथम बहूमान भारताने कायम केलेला आहे.कारण या ठीकाणी ३ देशांपैकी कोणाचेही चांद्रयान आतापर्यंत उतरू शकलेले नव्हते.म्हणून हा विजय या अर्थाने आणखी आगळा वेगळा ठरलेला आहे.यावेळी आपले यान चंद्रावर यशस्वीपणे उतरणार हा आत्मविश्वास ईस्त्रो शास्त्रज्ञांनी अगोदरच व्यक्त केला होता आणि तो सार्थ ठरला.या अभिमानास्पद आणि गौरवास्पद कामगिरीबद्दल देशवासीयांनी शास्त्रज्ञांचे अंत:करण्यातून भावविभोर  होत आभार मानले. भारताची यशस्वी चांद्रयान मोहीम  पंडीत नेहरू ते पंतप्रधान नरेन्द्र मोदी या साखळीमधील सक्षम नेत्यांच्या दुरदृष्टीचे हे फलित म्हणावे लागेल.
       ईस्त्रो शास्त्रज्ञांनी आपल्या वैज्ञानिक अभ्यासू वृत्तीने बुध्दीमत्तेच्या साऱ्या कक्षांचा एकाग्रतेने उपयोग केला.चंद्राचा पृष्ठभाग,तेथील भूमी, हवामान, चंद्राच्या पोटातील खनिजे आणि जलाशयाच्या व इतर अनेक बारकाव्यांचा अभ्यास केला.आणि ध्येयसिध्दीच्या आंतरिक चिंतनातून अविरत कठोर मेहनतीने सर्व भारतीयांना एका अभिमानास्पद भाग्यवान आनंदी क्षणाचे साक्षीदार ठरविले.हा आनंद व्यक्त करणाऱ्यांकडे हृदयातील भावनांमधून उत्स्फूर्तपणे उडणारे जलाभिषेक करणारे कौतुकाचे रंगबिरंगी कारंजे होते.हृदयाचे ठोके वाढविणारा समाधानाच्या रोषनाईचा हा लकलकणारा प्रकाश होता.कारण तोच प्रकाश उद्याच्या पिढ्यांना गगणचुंबी विकासाचे गतिमान मार्ग दाखविणारा मार्गदर्शक प्रकाश ठरणार आहे.
          या यशाने भारताचे चांद्रयान- २ या मोहिमेतील अपयश पूसून काढले आहे.ते भूतकाळाच्या उदरात कायमचे गडप होणार आहे. तेव्हाच्या अपयशाने ईस्त्रो प्रमुख डॉ.के सिवन यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.त्यावेळी पंतप्रधान म्हणूनज नरेन्द्र मोदींनी त्यांना आश्वासक धीर दिला होता.परंतू के.सिवन आणि त्यांच्या वैज्ञानिक टीमने हिंमतीला हारू दिले नाही‌. प्रयत्नातील सातत्य अभ्यासपूर्वक कायम ठेवले,आणि मागे मागे सरत घेतलेली तिसरी गतिमान उडी यशस्वी करून दाखविली.सोबतच  ध्येयपूर्तीच्या या जिद्दी संकल्पाने संपूर्ण भारतियांचे अभिमान मिश्रीत प्रेम आपल्या कवेत घेण्याच्या अतुलनिय मौलिक विजयाची मोहिमही फत्ते केली.चांद्रयान प्रयोगावर यशाचे शिक्कामोर्तब करणारे सारे शास्त्रज्ञ हे करोडो देशबांधवांच्या भावनात्मक सदिच्छांचे पाठबळ प्राप्त करणारे भाग्यविजेते ठरले आहेत‌...! 
      आयुष्यात आनंदाश्रू  येत असतात की ज्या क्षणांनी हृदय उचंबळून येतात...भावनांचे भुकंप होतात.परंतू या शास्त्रज्ञांच्या आणि भारतियांच्याही भाग्यवान आयुष्यात आलेले  वैभवी क्षण हे देशाच्या इतिहासात चिरंतन अक्षयी ठरणार आहेत‌.शास्त्रज्ञांनी स्वतःला  हरवून घेतलेले खडतर परिश्रम आणि असिम वैज्ञानिक साधनेची त्यांना नियतीने प्रदान केलेली चिरंतन पावती ठरणार आहे. प्रयत्न कसे असावेत, साधलेली प्रगती कशी असावी, आणि त्यासाठी ध्येयपूर्तीच्या आसक्तीने  झपाटलेली साधना कशी असावी ह्या यशाच्या रहस्यमयी प्रेरणा देशातील युवकांनी सतत नजरेसमोर आणि मनात जतन करून ठेवल्या पाहिजेत.आयुष्यात अपयशं आलित तरी परत परत आपले यान मार्गावर कसे आणावे याचा अभ्यास या प्रेरणांमधून केला पाहिजे.कारण भारतियांच्या अनेक आकांक्षांना नवं बळ देणारी ही मोहिम ठरणार आहे‌.यामुळे देशाच्या प्रगतीला नवा  हातभार लागणार आहे.मनुष्य आता चंद्रावर वसाहतीचे स्वप्न पाहणार आहे.
       २० जुलै १९६९ रोजी निल आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर उतरले होते.ते लहानसे पाऊल उद्याची मोठी झेप ठरेल असे त्यावेळी म्हटल्या गेले होते.ते सत्य या चांद्रयान- ३ च्या मोहिमेने आनंदभरीत सत्यामध्ये प्रत्यक्ष उतरवले आहे.हे क्षण तमाम भारतियांसाठी अवर्णनीय आनंदाचे क्षण ठरले आहेत.प्राचिन भारतीय ऋषींनी विश्वाचा वेध आपल्या अंतर्दृष्टीने घेतला होता.त्यातून विश्व कल्याणाचे संदेश देणारी उपनिषदे जन्माला आली.आज भारतीय वैज्ञानिक याच विश्वाचा वेध आपल्या वैज्ञानिक कर्तबगारीने घेत आहेत.हे यश विज्ञानशास्त्राच्या आणि समस्त शास्त्रज्ञांच्या सकारात्मक साधनेचे ,प्रबळ इच्छाशक्तीचे आणि संघटीत कठोर मेहनतीचे फळ आहे.या सुवर्णमय उपलब्धीबध्दल ईस्त्रो,सर्व शास्त्रज्ञ आणि कोटी कोटी भारतियांचे अभिनंदन शास्त्रज्ञांच्या यशाला मानाचा मुजरा.....! त्यांच्या वैज्ञानिक साधनेला  मन:स्वी सदैव शुभेच्छा...!
संजय एम. देशमुख (निंबेकर)
मुख्य संपादक मोबा.क्र ९८८१३०४५४६

    Post Views:  373


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व