माऊलींच्या जन्मभूमीत विज्ञानाचा साक्षात्कार!


ढगांचा पडदा उघडला, सूर्य डोकावला, किरणोत्सव पाहून खगोलशास्त्रज्ञांनाही अश्रू अनावर!
 संजय देशमुख  04 Dec 2021, 11:14 AM
   

औरंगाबाद (पैठण): संत ज्ञानेश्वर महाराज (Dnyaneshwar Maharaj) यांची जन्मभूमी म्हणजे पैठण (Paithan) तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगाव. कार्तिक वद्य त्रयोदशी या दिवशी संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या 21 व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. हा ज्ञानसूर्य मावळल्यानंतर आळंदी तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मगावी म्हणजेच पैठण येथील आपेगावात (Apegaon) माऊलींचा संजीवन समाधीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा या सोहळ्याची तिथी 2 डिसेंबर रोजी होती. अवघ्या जगाला विज्ञान आणि अध्यात्माची शिकवण देणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या या समाधी सोहळ्याच्या दिवशी आपेगावातील भाविकांना विज्ञानाची  मोठी अनुभूती आली.

दाटलेल्या ढगांतून चार मिनिटेच उगवला सूर्य

सध्या राज्यभरात पाऊस आणि ढगाळलेले वातावरण असताना फक्त आणि फक्त माऊलींच्या समाधीच्या क्षणांना काही मिनिटेच दाटलेल्या ढगांतून सूर्य उगवला आणि माऊलींच्या मुखकमलावर सूर्यकिरणे पडली. ज्ञानेश्वर माऊलींनी दुपारी 1 वाजेच्या सुमारास इंद्रायणी काठी समाधी घेतली होती. तीच वेळ साधत आपेगाव येथील मंदिरातही माऊलींच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडावीत, यासाठी वास्तुशास्त्रज्ञ महेश साळुंके आणि खगोलशास्त्रज्ञ गेल्या दोन वर्षांपासून सूर्यकिरणे आणि पृथ्वीच्या भ्रमणाचा अभ्यास करीत आहेत. त्यानुसार तयार केलेल्या यंत्रणेला गुरुवारी समाधीच्या क्षणांना यश येईल की नाही, याबाबत साशंकता होती. कारण मागील आठवडाभरापासून औरंगाबादसह मराठवाड्यात कुठेही सूर्यदर्शन झाले नव्हते. पण संजीवन समाधीच्या वेळी अगदी चार मिनिटे ढगाळलेल्या वातावरणातही सूर्य डोकावला आणि माऊलीच्या मुखकमलावर सूर्यकिरणे पडली. हा किरणोत्सव पाहून माऊलींवर नितांत श्रद्धा असणाऱ्या भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही तर तो घडवून आणण्यासाठी विज्ञानाच्या माध्यमातून अथक परिश्रम करणारे वास्तुशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ यांनाही अश्रू अनावर झाले.

Warkari, Paithan

किरणोत्सवाचे दर्शन झाल्यावर भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद

मंदिरात माऊलींचा जयघोष अन् खगोलशास्त्रज्ञांच्या डोळ्यातून अश्रू…

समाधी सोहळ्याची वेळ साधत माऊलींच्या मूर्तीवर प्रकाशकिरणे पडावीत, यासाठी सूर्य आणि पृथ्वीच्या भ्रमणाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करण्यात आला. वास्तुशास्त्रज्ञ महेश साळुंके आणि खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी हा मेळ जुळून येण्यासाठी मागील तब्बल 120 वर्षांत या तिथीला सूर्य कोणत्या स्थानी होता, याचा अभ्यास केला. तेव्हा कुठे समाधी क्षणांनाच सूर्याने दर्शन दिले. मंदिरात माऊलींच्या नावाचा जयघोष सुरु झाला अन् खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. भाविकांना समाधी क्षणांची अनुभूती येण्यासाठी विज्ञानाच्या, खगोलशास्त्राच्या माध्यमातून केलेल्या अथक प्रयत्नांसाठी ओघळलेले ते अश्रू होते, अशी प्रतिक्रिया श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

Shrinivas Aundhkar, Apegaon

विज्ञानाच्या सखोल अभ्यासानंतर जुळून आलेल्या किरणोत्सवानंतर खगोलशास्त्रज्ञांनाही अश्रू अनावर झाले

डेमो घ्यायला संधीच नव्हती, मनात धाकधूक.. पण सूर्य दिसला!

संजीवन समाधी क्षणांना झालेल्या किरणोत्सवाच्या वेळी अत्यंत भावूक झालेले श्रीनिवास औंधकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासूनच्या अभ्यासाचे फळ मिळाल्याचा अनुभव या दिवशी आला. या किरणोत्सवाच्या अनुभवासाठी आमचा अखंड अभ्यास सुरु होता. पण ऐन वेळी आठवडाभर आकाशात सूर्यदर्शनच झाले नव्हते. किरणोत्सवाचा डेमो घेण्याची संधीदेखील आम्हाला मिळाली नव्हती. समाधी दिवसाच्या आधीचे 2-3 दिवस तर पाऊसच होता. पण आमच्या खगोलीय तपस्येचे फळ मिळावे आणि काही क्षण तरी सूर्य दिसावा अशी इच्छा होती, ती खरी ठरली…

वास्तुशास्त्रज्ञ महेश साळुंके यांचे विशेष योगदान

आपेगाव येथील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मागील 12 वर्षांपासून काम करणारे वास्तुशास्त्रज्ञ महेश साळुंके यांनी या किरणोत्सव सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले. जगाला विज्ञानाची कास धरायला लावणाऱ्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिरही त्यांच्याप्रमाणेच अजरामर व्हावं, यासाठी जीव ओतून मंदिर उभारणीचं काम केलं. किरणोत्सवासाठी विशेष काय मेहनत घेतली हे सांगताना महेश साळुंके म्हणाले, आपेगावच्या आकाशात 2 डिसेंबरला सूर्य कुठे असेल, किरणे कुठे पडतात, याचा मागील 120 वर्षांचा अभ्यास आम्ही केला. यासाठी खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं. माऊलींचं मंदिर उत्तरमुखी आहे. सूर्य पुर्वेकडून उगवून पश्चिमेकडे जाताना दक्षिण बाजूची सूर्यकिरणं मंदिरातील आरशावर पडून परावर्तनाद्वारे ती माऊलींच्या मुखकमलावर पडावीत, अशी रचना आम्ही केली. या वर्षी प्रथमच या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार होता. मात्र ऐनवेळी 3-4 दिवसांपासून आकाशात काळेकुट्ट ढग दाटलेले होते. आकाश एवढं अच्छादलेलं होतं की अर्धा महाराष्ट्र त्याखाली होता. पण केवळ समाधी क्षणांच्या चार मिनिटांच्या वेळी ढगांचा पडदा बाजूला झाला आणि साक्षात माऊलीच प्रकटल्याचा अनुभव मिळाला!

जीर्णोद्धारानंतर प्रथमच समाधी सोहळा

Kirtan Apegaon

आपेगाव येथील समाधी सोहळ्यात कीर्तनात रंगलेले भाविक

श्रीक्षेत्र आपेगाव येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले होते. मात्र कोरोना काळामुळे मंदिरात कुणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कार्तिक काल्याच्या दिवशी समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी प्रथमच माऊलींच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली आणि भक्तांना एक विलक्षण अनुभूती आली, अशी प्रतिक्रिया मंदिरातील विष्णू महाराज कोल्हापूरकर यांनी दिली.

    Post Views:  310


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व