मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे आणि ममतादीदींच्या भेटीची अधिकृत माहिती राज्य सरकारने जाहीर केली पाहिजे. हे एक कटकारस्थान असून इथले उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाण्यास सत्ताधारी शिवसेना मदत तर करीत नाही ना? असा सवाल आशिष शेलार यांनी केला.
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जींच्या दौऱ्यावर काही प्रश्न उपस्थित केले. ममता बॅनर्जी यांची आदित्य ठाकरे यांनी काल भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्यावतीने ही भेट आपण घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या गुप्त बैठकीमध्ये कटकारस्थान तर नाही ना शिजलं? असा सवाल शेलार यांनी केला आहे.
ममतादीदींचे महाराष्ट्रात सरकारी पक्षांनी स्वागत केले. ते प्रथेप्रमाणे अपेक्षितच आहे. पण त्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेली भेट व त्यांची झालेली बैठक कशासाठी होती? महाराष्ट्रात कोणीही आले की आमचा कौटुंबिक स्नेह असल्याचे सांगून या भेटी घेतल्या जातात. तुमचा कौटुंबिक स्नेह असेलही. आम्हाला त्याबद्दल काय करायचे आहे? पण महाराष्ट्राचा त्याच्याशी काय सबंध? बांग्लादेशीयांना संरक्षण देणाऱ्या ममतादिदी यांच्याशी कुठले आले कौटुंबिक संबध? असा सवालही त्यांनी केला.
ममतादिदी महाराष्ट्रातील उद्योगांना आपल्या राज्यात यायचे आमंत्रण देण्यासाठी आल्या आहेत. देशभर सर्वत्र उद्योग धंदे असले पाहिजे हीच भाजपाची भूमिका आहे. मात्र आपल्या राज्यातील उद्योग तुम्ही घेऊन जा, असे महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना दिदींना सांगते आहे काय? हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील रोजगार, व्यवसाय, इंडस्ट्रीज इथून घेऊन जाण्यास सत्ताधारी शिवसेना ममतादिदींना मदत करते आहे काय? महाराष्ट्रात कँग्रेसला ना स्थान, ना इज्जत, ना किंमत, ना स्थिती त्यामुळे काँग्रेसला काय ते त्यांचे त्यांनी ठरवावे. आमचा सवाल महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला पाठवून महाराष्ट्रातील तरुणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
आम्हाला जय हिंदू राष्ट्र हे मान्य आहे, ते ममतादिदींना मान्य आहे का? ते मान्य नसेल तर ते शिवसेनेला मान्य आहे का? असा सवाल त्यांनी केला. हिंसेच्या घटनांनी पश्चिम बंगालमधील जनता त्रस्त आहे. आता हे दोघे मिळून बंगाल आणि महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुमच्याकडे आलेल्या टाटांना तुम्ही अपमानीत करून पाठवलेत. उद्योग जगतात ज्यांचे आदराने नाव घेतले जाते त्या मुंबईकर टाटांचा ज्यांनी अपमान केला त्यांना शिवसेना महाराष्ट्रात पायघड्या घालते? आणि आम्हाला मग महाराष्ट्र धर्म तुम्ही शिकवता? असा सवालही त्यांनी केला. म्हणून या बैठकीमागे कटकारस्थान आहे. ते हिंसाचाराचे आहे, रोजगार पळवण्याचे आहे, कारखाने पळवण्याचे आहे. दहशत पसरवण्याचे आहे का? असा सवाल त्यांनी केला.
Post Views: 196
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay