अल्पखर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान साठी चार गावांची सेवाधर्म संस्थे कडून निवड
जिल्ह्यातील यावलखेड, वरोडी, सांगळुद , धोतर्डी या गावाचा समावेश
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
01 Dec 2022, 3:54 PM
अकोला : हवामानानुकूल - अल्पखर्चिक शाश्वत तंत्रज्ञान राबविण्यासाठी जिल्हा निहाय संस्थांची निवड केली असून सेवाधर्म शिक्षण व बहुउयुद्धेशिय संस्था अकोला या संस्थेने यावलखेड, वरोडी, सांगळुद व वरोडी या चार गावात अफार्म चे अध्यक्ष प्रमोद देशमुख, कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी, प्रकल्प संचालक एस. एन. साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2024 दरम्यान राबविण्यात येणार आहे.
या साठी सेवाधर्म संस्था चे अध्यक्ष प्रा. धनंजय कोठाले व सचिव तुषार हांडे यांचे सह समस्त संचालक मंडळ कार्यरत आहेत.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ७० टक्के जन समुदायाची उपजीविका शेती व शेती सलग्न व्यवसायावर अवलंबून आहे, तथापि घटलेली उत्पादकता, एक पीक पध्दतीचा वापर, उत्पादन खर्चातील वाढ, अपुरा व त्रोटक वित्त पुरवठा, काढणी पश्चात प्रक्रिया व कृषी माल मूल्यवर्धनाचा , शेतीतील व्यवसायिक तेचा अभाव, बाजार भावातील अनिश्चितता, शेतीला जोड धंद्याचा अभाव, असंघटित शेतकरी तसेच अल्प खर्चिक शेती तंत्रज्ञान कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात कृषी विस्तार यंत्रणाना लागत असलेला वेळ, कृषी विषयक शासकीय योजना अंमलबजावणी मध्ये होत असलेली दिरंगाई, लहरी पाऊस इत्यादी कारणामुळे शेती व शेती संलग्न व्यवसाय किफायतशीर होतांना दिसत नाही. पर्यायाने ग्रामीण कुटुंबातील पिढीजात कृषी व्यवसाय मधून बाहेर पडून बिगरशेती रोजगाराशी संबंधित संधीच्या शोधात शहरा कडे वळताना दिसून येतो. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील लहान व अल्प भूधारक , अदिवासी महिला शेतकरी यांना केंद्र स्थानी ठेऊन ग्रामीण कुटुंबाची उपजीविका सक्षम करण्यासाठी अफार्म मार्फत हवामान अनुकूल शेती एकात्मिक कृषी प्रणाली मजबूतीकरण व कृषी उद्योजकता विकास इत्यादी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत महाराष्ट्रातील कोरडवाहु भागातील छोट्या, अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या निवडक अफार्म सदस्य व इतर संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अल्प खर्चिक शेती तंत्रज्ञान विषयी क्षमता वर्धन व्हावे व त्यांच्या माध्यमातून कोरडवाहू भागातील छोट्या, अल्प भूधारक शेतकऱ्या पर्यंत अल्प खर्चिक शेती तंत्रज्ञान पोहोचावे यासाठी आखणी करण्यात आली आहे.
पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीचे उत्पन्न वाढी साठी बदलत्या हवामानानुसार , कमी खर्चात जास्त उत्पादन मिळविण्यासाठी जमिनीतील ओलावा संवर्धन पद्धती, मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत, स्थानिक वनस्पती संरक्षण उपाय, एकात्मिक पोषक आणि कीटक व्यवस्थापन, सेंद्रीय शेतीसाठी पशुधन संगोपनाची गरज आदी प्रमुख विषयावर ऍक्शन फॉर अग्रीकल्चर रिन्यूवल इन महाराष्ट्र ( अफार्म) , पुणे च्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोरडवाहू जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
Post Views: 343