श्रीमंत भारतातल्या गरीबांना वैभवाची श्रीमंती कधी दिसणार? : संजय एम. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
01 Oct 2022, 7:29 PM
प्रत्येक माणसाने भूतकाळातल्या फुशारक्या मारत आणि भविष्यकाळातील खोट्या फुसाड्यांच्या स्वप्ननगरीची सैर घडविणारांच्या भरवशावर जगू नये. नकली, बनावट भविष्यवेत्त्त्यांच्या नांदी लागून अंधभक्तीत आपले,कुटूंबांचे आणि ईतरांचेही किती आणि कसे नुकसान होऊ शकते याचे अनुभव अनेकांना येत असतातच.असे अनुभव वाटचालीत कुणाला आले नसतील अशी माणसं या देशात बोटावर मोजण्याइतकी नगण्य असतील. मनुष्यजन्माच्या चित्रपटात कलाकार म्हणून रंगभूमीवर आलेल्या सुज्ञ आणि तज्ञ अभिनेत्यांना स्वत:ला सुपरपावर म्हणून सिध्द करायचे असेल तर आयुष्यात आलेल्या या वाईट अनुभवातून शिकलं आणि सावरलंही पाहिजे.अशा पध्दतीने तयार झालेली मानवी आयुष्याच्या जहाजावरील आपल्या कुटूंबाचे कर्णधारच विशाल सागराच्या हेलकांव्यांवरील आपली जहाजं वाचवू शकतील.मानवताधर्मातील समाजशीलतेने ईतरांना वाचण्यास हातभार लावतील.अनेक वादळांमधून अनुभव, अभ्यास,अंदाजाच्या आडाख्या तडाख्यातून तरबेज झालेले असली पुरूषार्थी नावाडीच चुकीच्या दिशा दाखविणाऱ्यांच्या अंधभक्तीत न अडकता स्वतंत्र निर्णयक्षमतेने पैलतीराकडे जाऊन आपले निश्चित ध्येय पूर्ण करीत असतात.
हे चिरंतन सत्त्यच मानवी जीवनाच्या विकासमार्गातील मजबूत अधिष्ठाण असते.ते अनेक महापूरूषांच्या कर्ममार्गातून सिध्द झालेले ऐतिहासिक सत्त्य आहे.परंतू अनेक वेळा वेड्या प्रेमात जगून, मोहजालातील जादुई दुनियेत मुर्ख बनत जाणाऱ्या काही पांथस्तांना, माणूस म्हणविणाऱ्या माणसांना हेच कळेनासे होते. त्यादिवशी मानवी जीवनात संकटांच्या लाटांनी आलेली हतबलता,दयनिय अवस्था त्यांना विनाशाकडे घेऊन जात असते.त्याच्यातील आणि विपन्नावस्थेच्या केंद्रबिंदूमधील अंतर दिवसेंदिवस कमी कमी होत जाते,तरीही जादुई चमत्कारांनी या गोड गोड बोलणाऱ्या बहूरूपी लोकांची वेडी माया त्याला चमत्कारी लॉटरी सोडतींच्या आशेवर अधिक जगायला लावते.परंतू तरीही शेवटचा श्वास घेईपर्यंतही आपल्याला लावलेली लसीकरणासारखी ही शेवटची पर्यायी सलाईन होती हे त्यांना समजत नसते.शेवटी गुलामगीरीतच त्यांचा अंत कधी होतो हे त्यांनाही कळत नसते.असाच दैवदुर्विलासी आमचा हा भारत...हिन्दुस्तान आणि लव्हली इंडिया आहे... ! आपल्या विकलेल्या विचारांनी,गहाण ठेवलेल्या आणि त्यातच जंगलेल्या बुध्दींनी बुध्यांकच घालविल्याने काही ना काही कारणांनी येथील भारतवासी अनेक वेळा परदास्यात जगत आलेले आहेत.
जसे म्हणतात न्यायाधिशांच्या मुलगा न्यायाधिश, वकीलाचा वकील,डॉक्टरांचा डॉक्टर होतो.त्याप्रमाणे बापाने कमवून दिलेल्या संपत्तीवर त्याचा मुलगा कायम श्रीमंतच राहिल असं घडल्याची उदाहरणं फार कमीच असतात.कारण आयुष्याच्या महासागरातील जहाजावरचा तो निष्णात नावाडी होईलच असं काही सांगता येत नाही.कदाचित बापदाद्यांच्या पूर्वीच्या काही ऐतिहासिक कर्तृत्वाच्या पुण्याईने त्याला मदत होऊन तो तरेल. परंतू वैचारीक गुलामांची मुलं जर गुलामच झाली तर भविष्यात त्यांची होणारी वाताहत पाहण्यासाठी ते राहू शकणार नाहीत.खरोखरच आपलं त्यावेळी काय चुकलं होतं हे पाहण्यासाठी ते परत जन्मही घेऊन येऊ शकणार नाहीत.मग त्यांनी अंतर्मनातील चिंतनांनी,स्पर्शून जाणाऱ्या जाणीवांनी तथा दुरदर्शित्वाने भूतकाळ आणि भविष्यकाळाचे काहूर थांबवून वर्तमानातच ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच भावी पिढी वाचविण्यासाठी अनेक बापदाद्यांनी केलेले ते क्रांतिकारी कार्य ठरेल...!
माणसांचं आयुष्य हे विचारांच्या शक्तीने घडत असतं. अनुचित गोष्टींची ठराविक चौकट,आणि अपप्रवृत्तीच्या कोंढवाड्याच्या भिंती तोडणे हे विकासाच्या दिशेने जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना काळाचे संकेत असतात.अंर्तमनाच्या साद प्रतिसादाच्या जाणीवा असतात.तरीही जड अवस्थेत गेलेली अनेक माणसं या हेलकाव्यांनीही लवकर हलत नाहीत. स्वतंत्र विचारांनी घराबाहेर टाकावी लागणारी परिवर्तनिय पाऊलं योग्य वेळी टाकली जात नाहीत.
परवा भारतिय राजकारणातले एक विधायक विचारांचे अनुभवसमृद्ध व्यक्तिमत्व,माणूसपणाच्या व्याख्येत ज्यांना खरोखरच सच्चा माणूस म्हणता येईल असे विदर्भ सूपूत्र नितीनजी गडकरी एक महत्वाचं बोलले.ते आमचे केन्द्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत.परंतू रस्ते बांधता बांधता ते माणसाच्या आयुष्याच्या महामार्गालाही डागडूजी करून दुरुस्त करण्याचेही प्रयत्न करीत असतात.कधी कधी "माणसापरिस मेंढरं बरी" म्हणण्याची परिस्थिती येते. कारण भारतीय राजकारणात अशाच कुपूत्रांचा सुळसुळाट जास्त झालेला असल्याने त्यांच्याच अनैतिक व्यभिचाराने समाजाचे जीवन आज संकटमय झालेलं आहे.
गडकरीं म्हणाले....भारत हा जगातील पाचव्या क्रमांकावरील मोठी अर्थव्यवस्था असणारा देश असूनही येथील लोक गरीब कसे? येथील लोकसंख्या,बेरोजगारी,जातियवाद,अस्पृश्यता,आणि महागाईचा ज्वलंत सामना करीत आहे.नितीनजी खरं आणि मुख्य म्हणजे वर्मावर बोट ठेऊन बोलले.असंच अनेकदा ते मनापासून बोलत असतात. म्हणून त्यांना सुपरपावरपासून नेहमी दुर रहावं लागतं.येथील अज्ञान,गरीबी,आणि दारिद्र्याने गांजलेल्या माणसांच्या वस्त्रांची लक्तरे तोडून त्यांना नागवं आणि भिकारी कोणी केलं? गडकरीसाहेब या देशाला कुरतडणाऱ्या उंदरांचा शोध लावावा लागेल असं ईतरांना जरी वाटत असेल तरी त्याची कारणं आपल्या चिंतनातून आपणास सापडलेली आहेत.हे उंदिर जुणेच आहेत असं जर कोणी म्हणत असेल,तर ते त्यावेळीचं अंशतः सत्त्य होतं.परंतू आता नव्या प्रजातींमुळे ही कंगालपणाची भिषणता अधिक वाढलेली आहे.कारण आपल्या देशातील झोपड्या परदेशी पाहुण्यांना दिसू नयेत म्हणून त्यांना भिंती उभारून तात्पूरत्या लपविण्याच्या चोऱ्या करणारे,मानसिक व्यभिचार करणारे राजकारणी आमच्याकडे आहेत.वेळ मारून नेण्यासाठी भुलधापांच्या मलमपट्टया करणारे कावेबाज राजकारणी कायमस्वरूपी ईलाजांची मानसिकता बाळगू शकत नाहीत.
या देशातील सर्वसामान्न्यांच्या श्रमिकांच्या,शेतकऱ्यांच्या आणि छोट्या उद्योजकांच्या क्लेशमय जीवनास कारणीभूत ठरणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी इलाज शोधण्यास आम्हाला वेळ नाही.सरकारेपाडू राजकारणातून उसंत नाही.त्याची खरी गरज वाटत नाही.आम्हाला आवश्यकता पडेल त्यावेळी अनेक जुमले वापरून लोकांना फसवून दर पाच वर्षांच्या विमा पॉलिसी आम्ही काढत राहतो.आम्ही बलाढ्य आहोत, श्रीमंत आहोत हा पोकळ मोठेपणा जगाला दाखविण्यातूनच मनाचा खोटेपणा उघड करणारी आमच्या राजकारण्यांची जमात आहे.परंतू तरीही विरोधात बोलू नका म्हणून दडपशाही करण्यातही ते तरबेज आहेत.म्हणूनच या दिल्लीच्या सिमेवर अनेक शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांचा,हक्कासाठी भांडतांना त्यांची आयुष्ये संपविणाऱ्या निर्दयी राजकारण्यांचा हा देश जगानू पाहिलेला आहे. सर्वसामान्यांच्या जीवनाचे केले जाणारे खेळ मात्र आता झाकून राहिलेले नाहीत.कोंबडा कितीही ओरडला तरी आणि सत्त्याच्या न्यायाने चालणारा कर्तव्यवादी सुर्य कधी उगवायचा राहणार नाही....!
कवितेतून आम्हाला सांगणं होतं की इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा.... परंतू तरीही सोण्याच्या लंकेपासून तर निरोगी समाजव्यवस्थेतील सुलभ व्यवस्थेत आमच्या वाडवडीलांचे वैभव, श्रीमंती का टिकून होती? याचं उत्तर.... त्यावेळी राजकारण,समाजकारणातील माणसं प्रामाणिक होती. चोर, लफंगी, समाजाला फसविणारी नव्हती.म्हणून त्यावेळी निरोगी वैभवसंपन्न जीवनाचे ते भाग्यशाली वाटेकरी होते हेच आहे....! आता सगळंच बदललं गडकरीसाहेब....! लोकं मेली तरी बेहत्तर परंतू राजकारणापलिकडे काही करण्याची थोडीही शरम साध्या अनेक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकांपासून तर उच्चपदस्थांनाही वाटत नाही. त्यामुळे महागाई, बेरोजगारी, दारिद्र्य, धार्मिक आणि जातिय उन्मादाच्या वणव्यात सतत जळत राहणाऱ्या ते आपल्या राजकारणासाठी योग्य वाटतंय. म्हणून ते वणवे पेटवणारांना त्यातच दिसणाऱ्या अघोरी महत्वाकांक्षा सिध्द होण्याच्या आनंदात हे वणवे शमविणे गरजेचे वाटत नाही. त्या आगडोंबाच्या प्रकाशात येथील माणसांच्या जीवनात विकास,प्रगती आनंदाचा प्रकाश पसरविण्याची मानसिकता शिल्लक राहीलेली नाही. नुसती बुलेट ट्रेन आणि आता गुजरातच्या मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमुळे या देशातील सामान्न्य लोकांचं भलं होणार नाही. हे सत्त्य या देशातील संमोहित अंधभक्तांसह सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे.लोकांना गरीबी आणि वैचारीक गुलामगीरीत अडकवून ठेवणे, छोट्या छोट्या गरजांसाठी धान्न्याच्या दाण्यांसाठी पळणाऱ्या को़ंबड्याप्रमाणे माणसांची गर्दी आपल्यामागे धावत ठेवणे, ही क्रूर षड्यंयंत्रेच या व एकेकाळच्या वैभवशाली सुवर्णांकीत देशातील लोकांना गरीब ठेवण्यात कारणीभूत आहेत. हे सत्त्य ओळखून तरी विचार झाला पाहिजे. आता राहिला वर्तमान निदान आतापासून जर बदलत्या विचारांची दिशा ओळखून आपण संथगतीने जरी धावायला लागलो तर भविष्यात उद्दिष्टांच्या मुक्कामी पोहोचू शकू. या चिंतनिय विचारांची कांस पकडणारांची संख्या देशात आता वाढली पाहिजे....तरंच खोटे अच्छे दिन नव्हे तर कायम सुदिनच येतील.ते भरतियांच्या जीवनात यावेत ह्याच आगामी विजयाचा संदेश देणाऱ्या दसऱ्याच्या आणि दीपावलीच्या ही शुभेच्छा...!
संजय एम. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार
मोबा.क्र.९८८१३०४५४६
Post Views: 327