डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे अकोला येथे २२ सप्टेंबरला गायन स्पर्धा
विदर्भस्तरीय स्पर्धेच्या आडिशन्स : प्रत्येक स्पर्धकाला भेटवस्तू व प्रमाणपत्र
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
16 Sep 2022, 7:24 PM
अकोला: नागपूर येथील डॉ. दंदे फाउंडेशनच्या वतीने येत्या २२ सप्टेंबरला (गुरुवार) अकोला येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘व्हॉईस आफ लिटील मास्टर्स’ ही विदर्भस्तरीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आयएमए सभागृह, सिव्हिल लाइन्स येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत स्पर्धेची पहिली फेरी होईल. यातून नागपुरात होणाऱ्या अंतिम फेरीसाठी स्पर्धक निवडण्यात येतील. प्रत्येक स्पर्धकाला भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत 7 ते 16 वर्षे वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. स्पर्धेची अंतिम फेरी 12 आक्टोबरला नागपुरातील कवीवर्य सुरेश भट सभागृहात होणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध गायक संगीतकार सलील कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. स्पर्धेतील विजेत्यांना 50 हजाराहून अधिक रुपयांची रोख बक्षीसे देण्यात येतील.अंतिम फेरीत 21 हजार रुपये रोख व गौरवचिन्ह असे प्रथम पुरस्काराचे स्वरुप असेल. द्वितीय पुरस्कार 11 हजार रुपये व गौरवचिन्ह तर तृतिय पुरस्कार 5 हजार 500 रुपये व गौरवचिन्ह असा असेल. याशिवाय तीन प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येतील. आडिशन्ससाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 100 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 8767929607 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.अकोला येथील स्पर्धकांची नोंदणी प्रभात किड्स (तोष्णीवाल लेआउट, शासकीय दूध डेअरीच्या मागे) येथे करावी आणि शाळांनी देखील आपली यादी याच ठिकाणी पाठवावी.शालेय शिक्षकांसाठीही स्पर्धाफाउंडेशनच्या वतीने शालेय शिक्षकांसाठीही गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच केंद्रावर शालेय शिक्षकांच्याही आडिशन्सही होतील. कुठल्याही विषयाचे शिक्षक यात सहभागी होऊ शकतील. यातील सर्वोत्तम गायक निवडून त्यांचीही अंतिम फेरी नागपूरला होणार आहे. शिक्षकांसाठी 200 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे.
Post Views: 224