शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना पाठिंबा, अजित पवारांकडून भूमिका जाहीर


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  23 Jun 2022, 9:39 PM
   

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर  संकट उभे राहिले आहे. अशावेळी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन शिवसेनेकडून करण्यात येत आहे. या सर्व घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना शेवटपर्यंत पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, अशावेळी महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकार कसे टिकेल यासाठी प्रयत्न करत राहील. माझे दुपारीही त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले. आताही आदित्य ठाकरे यांच्याशी दुसर्‍या एका कामासाठी बोललो. काही आमदार परत आले आहेत. त्यात नितीन देशमुख, कैलास पाटील असतील, यांनी आपली भूमिका मांडली आहे. तिकडे गुवाहाटीमध्ये असलेल्या आमदारांना मुख्यमंत्र्यांनीही आवाहन केले आहे. आजही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आवाहन केले आहे. पण आमची भूमिका ही आघाडी सरकार टिकवण्याची आहे, असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
निधी वाटपातील दुजाभावाचे आरोप फेटाळले
दुसरीकडे अजित पवार यांच्यावर निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, आमच्यातील काही मित्रपक्ष काही वेगळे प्रश्न उपस्थित करत आहेत की अजित पवारांनी निधीचे असे केले तसे केले. सरकार अस्तित्वात आल्यावर आपण सगळ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री नेमले. त्यांना निधी देत असताना कुठेही काटछाट केलेली नाही. पण कशामुळे त्यांनी तसे वक्तव्य केले माहिती नाही. पण मी सगळ्यांना निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी असे चॅनेलवर बोलण्यापेक्षा आमची बैठक होते त्यावेळी सांगितले असते तर तिथेच समज-गैरसमज दूर झाले असते. आता तिघांची आघाडी आहे, ती कशी टिकेल, आताची परिस्थिती कशी हाताळता येईल, यासाठीच प्रयत्न करत आहोत.
शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात नाही...
एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेनेतील हे तिसरे मोठे बंड आहे. मात्र, अशावेळी शिवसैनिक कायम नेतृत्वाच्या पाठीशी राहतात. शिवसेनेत जेव्हा जेव्हा बंड झाले किंवा बडे नेते बाहेर पडले, तेव्हा तेव्हा नेते एका बाजूला राहतात आणि शिवसैनिक एका बाजूला राहतात. बंडखोरांना शिवसैनिकांनी योग्य जागा दाखवून दिली आहे. बंडखोरी करणार्‍यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांनी यामागे भाजप असल्याचा दावा महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून आणि शिवसेनेकडून केला जात असल्याबाबत विचारणा केली. यावर बोलताना, एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही, असे सांगत एक प्रकारे अजित पवार यांनी क्लीन चिट दिली.

    Post Views:  189


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व