उद्धव ठाकरे २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार... म्हणून भाजपने सरकार पाडले


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  11 Sep 2022, 12:25 PM
   

उस्मानाबाद/मुंबई - राज्यातील विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंसह ४० शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर राज्यात भाजपाच्या मदतीने सत्तांतर घडलं. परंतु खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला. ठाकरे-शिंदे गटाकडून आमचीच शिवसेना असा दावा करण्यात आला. उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या नेत्यांच्या शिंदेंकडून पक्षाच्या पदांवर नेमणूक करण्यात आली. शिवसेनेसोबत युवासेनेतही फेरबदल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, आता युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाईंनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यात ते बंडखोर आमदार आणि फुटीर शिवसेना नेत्यांवर निशाणा साधत आहेत. 

राज्यात ५ वर्षे मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे राहिले तर, 2024 साली ते पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार होतील, ही भीती असल्यानेच भाजपने सरकार पाडले, असा आरोप शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी केला आहे. तसेच, भाजप विरोधी प्रत्येक राज्यात जे पक्ष आहेत, ते पक्ष उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यामागे उभे राहतील हे भाजपला कळून आले होते. म्हणूनच, कुणाला खोके दिले, कोणाला धमकी दिली, अजून काही दिलं आणि आपल्याला पायउतार व्हावं लागलं, असा गंभीर आरोप वरुण सरदेसाई यांनी केली आहे. सरदेसाई सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उस्मानाबादेत युवासेना आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेच

युवासेना एकच आहे. या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आहेत. बाकी कुणाला काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येक गल्लीबोळात अनेक मंडळं असतं त्यामुळे असं मंडळ स्वत:ला कुणाला स्थापन करावसं वाटत असेल तर त्यांचा विषय आहे असं सांगत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. अलीकडेच शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी युवासेना प्रमुखपदी श्रीकांत शिंदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली होती.  

त्यांच्या संघटनेला फक्त सचिव

सरदेसाई म्हणाले की, प्रत्येक गणपती मंडळालाही अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यकारणी असते. परंतु त्यांची जी संघटना आहे त्याला फक्त सचिव आहे त्याला वर डोकंपण नाही आणि खाली पाय पण नाही. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सध्या आदित्य ठाकरे ज्याप्रकारे काम करतायेत त्यांच्यामागे राज्यातील जनता उभी राहतेय. गेल्या २ महिन्यात आदित्य ठाकरे राज्यातील प्रत्येक भागात फिरत आहेत. जनताही त्यांना कसा प्रतिसाद देतेय हे मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं आहे असं त्यांनी म्हटलं. 

    Post Views:  140


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व