प्रभातमध्ये विद्यार्थ्यांनी घेतला शाडू मातीपासून श्री गणेश निर्मितीचा आनंद
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
29 Aug 2022, 9:16 AM
अकोला: विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जागृती व्हावी व तसेच त्यांच्यातील कलागुणांना चालना मिळावी, या हेतूने, प्रभात किड्स येथे शाडू मातीचा गणपती बनविण्याची कार्यशाळा रविवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी घेण्यात आली.

प्रभातच्या आर्ट्स अँड क्राफ्ट विभाग व इको फ्रेंडली क्लब द्वारे आयोजित या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ मूर्तिकार व सामाजिक कार्यकर्ते शरद कोकाटे लाभले होते तर कार्यशाळेचे मुख्य आकर्षण आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् द्वारा ग्रँड मास्टर पदवीने सन्मानित बाल मूर्तिकार पूर्वा बगळेकर ही होती. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईचे कार्यकारिणी सदस्य अशोक ढेरे यांनी विशेष अतिथीचे स्वागत केले. यावेळी प्रभातच्या संचालिका सौ. वंदना नारे, सचिव नीरज आवंडेकर, प्रा. डॉ. सुहास उगले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शरद कोकाटे यांच्यासह कल्पना राव, प्रतिमा मानधने व दीपाली वकारे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवून पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बाल मूर्तिकार पूर्वा बगळेकर हिने श्री गणेश मूर्ती निर्मितीचे प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रभातचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांनी केले. आर्ट अँड क्राफ्ट विभागाचे दिनेश पाटील, प्रदीप विखे, प्रतीक वाघ तसेच सचिन मुरूमकार, श्रीकांत बुलबुले, आशिष बेलोकार, दिनेश आगाशे व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
Post Views: 292